सातगाव पठारचा पाणी प्रश्‍न बनला निवडणुकीचे गाजर

धरण उशाला तरीही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण

पेठ- दुष्काळी भाग असलेल्या सातगाव पठार (ता. आंबेगाव) येथील पाणी प्रश्‍न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. येथील पाणी प्रश्न फक्त लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत कलमोडी धरणारचे पाणी हे हक्काने मतदारांना दाखवायचे गाजर ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. धरण उशाला असूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी कॉंगेसच्या राजकीत आखाड्यातील भांडणात येथील पाणी प्रश्‍न अडकला आहे.

पुण्याहून राजगुरूनगर मार्गे येताना आंबेगाव तालुक्‍याचे प्रवेशद्वार म्हणजे पेठ गावातील सातगाव पठार भाग. येथील पारगाव ते कुरवंडी दरम्यान संपूर्ण सातगाव पठार भागात एकूण जिरायत क्षेत्र साडे सहा ते सात हजार एकर इतके आहे. चांगला पाऊस पडल्यानंतर बटाटा पीक अतिशय चांगले येते. पण बाजारभावाची खात्री नसते किंवा हवामान अनुकूल नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडत नाही. काही भागांत कमी प्रमाणात पडणारा पाऊस व थंडी यावर ज्वारी पीक चांगले येते. पण पाऊस पडल्याशिवाय कोणतेही पीक येत नाही. संपूर्णपणे पावसावर येथील शेती अवलंबून आहे. येथील भूभाग अति उंचावर असल्याने पावसाचे सर्व पाणी वाहून जाते. जमिनीतून पाण्याचा निचरा केल्याशिवाय पिकांची मुळे तग धरून राहत नाहीत.

येथील शेती सुपीक आहे. त्यामुळे ती विकसित करण्यासाठी कायमस्वरूपी पाणी शेतीला हवे आहे. यासाठी डिंभे धरणातून पाणी आणावे किंवा अन्य ठिकाणांहून पाणी आणून वेळ नदीत सोडावे, अशी मागणी येथील नागरिकांनी 25 ते 30 वर्षांपूर्वी केली होती. त्यासाठी लागणारा निधी मंजूर झाला असून प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. धरणाचे काम पूर्ण होऊन शंभर टक्के धरण भरले आहे. पण त्यावेळी कलमोडीच्या पाण्यावरून राजकारण तापले. सातगाव पठार भागाला पाणी कलमोडीचे देणार असाल तर खेड तालुक्‍यातील पूर्व भागातील 10 गावांना पाणी वितरण करण्याची मागणी करण्यात आली.
त्यावेळी कलमोडी जलउपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण खेड तालुक्‍यातील गावांत सुरू असताना स्थानिक शेतकऱ्यांनी उधळून लावून बंद पाडले. येथील शेतकरी सहामाही बटाट्याचे पीक घेतात. राजकीय उदासीनतेमुळे सातगाव पठार भागातील नागरिक आज भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. शेतातील पिके जळून चालली आहेत. निवडणुकीच्या प्रचारामध्ये राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कलमोडीचे पाणी पुढील वर्षी सातगाव पठार भागातील वेळ नदीत सोडण्याचे आश्‍वासन दिले आहे. गेल्या पाच वर्षांपासून जलउपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे निवडणुकीत नेत्यांनी दिलेले आश्‍वासने पूर्ण होतात का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

  • केवळ ठराविक गावांना सिलिंग
    कळमोडी पाण्यासाठी सातगाव पठार भागातील एकशे दहा शेतकऱ्यांच्या जमिनीला सिलिंग लावले आहे. खेड तालुक्‍यातील गावांना पाणी मिळणार असेल तर सिलिंग फक्त सातगाव पठार भागातच का? असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.