लाखणगाव-विवाह समारंभात शुभ आशिर्वाद देण्याची प्रथा कंटाळवाणी झाली असतानाच आता साखरपुडा, टिळा समारंभातही ही प्रथा सुरू झाल्याने वऱ्हाडी मंडळी अक्षरशः वैतागून जात आहे. विवाह मालकांनी या प्रथेला फाटा देण्याची गरज आहे.
विवाह समारंभाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. आता मंगलाष्टकांच्या अगोदर राजकीय नेते शुभ आशिर्वाद देत आहे. यामुळे अर्धा ते पाऊण तास विनाकारण वऱ्हाडी मंडळींना ताटकळत रहावे लागत आहे. मुळातच शुभ आशिर्वादाची प्रथाच रद्द झाली पाहिजे, अशी मागणी वऱ्हाडी मंडळी करताना दिसत आहे. लग्नसमारंभाची सर्वत्र धामधूम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, या लग्नसमारंभाला शुभेच्छा देणाऱ्यांची संख्याही वाढू लागल्याने पूर्वी लग्नाच्या वेळी शुभेच्छा देणारे राजकीय पुढारी आता साखरपुड्यातही शुभेच्छा देऊ लागले आहेत.
मंगल कार्यालयात लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगल कार्यालयात लग्न पार पडत असताना वऱ्हाडी मंडळींची कोणतीही दखल न घेता लग्न मालक स्वतःच्या स्तुतीसाठी साखरपुड्यांच्या वेळी ही शुभ आशिर्वाद देण्यासाठी पुढाऱ्यांना गळ घालत आहे. पूर्वी मंगलाष्टका सुरू होण्याच्या अगोदर ठराविक दोन-तीन व्यक्ती सर्वांच्या वतीने शुभेच्छा व शुभ आशिर्वाद द्यायची. परंतु लग्न कार्यालयामध्ये राजकीय पुढारी व अनेकांची गर्दी वाढू लागली. तसतसं शुभेच्छा देणाऱ्यांचेही प्रमाण वाढू लागले. या शुभेच्छा देत असताना लग्नाचा वेळ मुहूर्तही टळून जाऊ लागला. त्यातच या राजकीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने साखरपुड्याच्या वेळी शुभेच्छा व शुभ आशिर्वाद देण्याची परंपरा सुरू झाली आहे. त्यामुळे साखरपुड्याच्या कार्यक्रमालाही विलंब होऊ लागला आहे. 12 ते 1 वाजेपर्यंत हा कायक्रम चालत असल्याने वऱ्हाडी मंडळींना मनस्ताप होत आहे. त्यामुळे आशिर्वादाचे निघालेले फॅड थांबले पाहिजेत, अशी भावना सामान्य माणसातून व्यक्त होऊ लागली आहे. सामुदायिक विवाह होण्याचे प्रमाण कमी होऊन मंगल कार्यालयांमध्ये लग्न करण्याची पद्धत वाढली आहे.त्यातच साखरपुड्याला होणारा उशीर व शुभेच्छा, शुभ आशिर्वाद देणाऱ्यांची भरमसाट संख्या यामुळे साखरपुड्याचा कार्यक्रम रटाळवाणा झाला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा