साई समाधी शताब्दीत संस्थानने लाविले दिवे!

सरकारी घोषणाही विरल्या हवेत; शिर्डीकरांनीच पाऊल उचलण्याची आवश्‍यकता

शिर्डी – साई समाधी शताब्धी वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना वर्षभरापूर्वी साईबाबा संस्थान आणि राज्य शासनाच्या वतीने साईसमाधी शताब्धी वर्षानिमित्त करण्यात आलेल्या विकासाच्या घोषणा हवेत विरल्या आहेत. या दोन्ही यंत्रणांनी दिवे मात्र लावले असल्याचे चित्र सर्व भाविकांना शिर्डीत बघायला मिळाले आहे.
साई समाधी शताब्धी सोहळा भव्य दिव्य स्वरूपाचा व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शिर्डीसाठी विकास आराखडा तयार केला. त्यासाठी तीन हजार कोटी रुपये मंजूर केले होते; मात्र या निधीची फुटकी कवडीसुद्धा मिळाली नाही. याउलट संस्थानच्या तिजोरीतून शासनाने पैसे इतरत्र ठिकाणी दिले. विकास कामांबद्दलचे प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते, ते अद्यापपर्यंत शासनाच्या लालफितीत अडकले आहेत. भक्तांच्या मनोरंजनासाठी साईसृष्टी गार्डन, शहरातील रस्त्यांचे भूसंपादनाचे प्रश्न असोत की विद्यार्थ्यासाठी आयएएस ऍकेडमी; याबाबतचे सर्व प्रस्ताव अडकून पडले आहेत. जगभरातील भाविकांच्या स्वागतासठी उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी मिळाली; मात्र तीसुद्धा उभारण्यात साईबाबा संस्थान अयशस्वी ठरले. शताब्दी सोहळ्याच्या समारोपासाठी एका भाविकाच्या देणगीतून तात्पुरत्या स्वरुपात स्वागत कमान उभारण्यात येणार आहे.
देश विदेशातील भाविकांनी वर्षभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. आरोग्य शिबिरे घेतली. शताब्दी वर्षात साईबाबा संस्थानने काय केले, असा प्रश्न भाविकांसह ग्रामस्थ विचारत आहे. साई समाधी शताब्दी सोहळा साजरा करण्याची जबाबदारी साईबाबा संस्थानची आहे; परंतु स्थानिक नागरिकांचाही त्यासाठी पुरेसा दबाव आला नाही. नागरिकांनी शिर्डीकर म्हणून समाधी शताब्दी वर्षांत काय योगदान दिले, हा प्रश्‍नही तितकाच महत्त्वाचा आहे. शिर्डीतील व्यावसायिकांनी सकारात्मक प्रयोग करायला हवे होते; परंतु त्यांनी ते केले नाहीत. रिक्षा, प्रवाशी वाहने, प्रसाद, हार आदींचे दर समाधी शताब्दी वर्षांत नक्की करून शिर्डीकरांची प्रतिमा उंचावता आली असती. शहरातील लॉजिंगमध्ये सेवाभाव उरला आहे का, हा संशोधनाचा विषय आहे. हा व्यवसाय पूर्णताः पॉलिशीवाल्यांच्या ताब्यात गेला आहे. शिर्डीत मोजकी हॉटेल पॉलिशीवाल्यांना बाजूला ठेवून चालतात. पॉलीशीवाल्यांना जवळ पास पन्नास टक्के रक्कम द्यावी लागत असल्याने लॉजमालकांचे ग्राहक सेवेकडे दुर्लक्ष झाले आहे. तेथील स्वच्छता, कर्मचाऱ्यांचा टापटीपपणा, बोलण्यातील सेवाभाव याचाही बहुतांशी ठिकाणी अभाव दिसून येत आहे.
काही गोष्टी अपवाद म्हणून बाजूला ठेवल्या, तर शिर्डीकरांनी शताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या सप्ताहाचे कौतुक केले पाहिजे. यामध्ये शिर्डीकर तन, मन, धनाने सहभागी झाले होते. प्रत्येकाने दिवसरात्र वेळ देऊन ऐतिहासिक असा सद्‌गुरू गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या दिमाखात साजरा केला. शिर्डीकरांनी ठरविले तर ते काहीही करू शकतात. आता शताब्दी जरी संपत आली असली, तरी शिर्डीकर आपल्या भविष्याचा विचार काही चांगले नियोजन करू शकतात. कल्पकता दाखवू शकतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)