सांगा कसं जगायचं?

संपदा देशपांडे

आपले बाह्य व्यक्‍त्तिमत्त्व हे आपल्या स्वभावावर अवलंबून असते.आपली वृत्ती जर आनंदी असेल तर तुमच्याकडे सौंदर्य असो वा नसो चार-चौघात तुमची छाप पडतेच.तसंच प्रयत्नांमुळे तुम्ही विचार करुन वागायला शिकता.तुमचा स्वभाव स्थिर होतो.तुम्ही शक्‍त्तीशाली होता. अपयशामुळे तुमच्यात नम्रता येते.यशामुळे आत्मविश्‍वासनिर्माण होतो. पण फक्‍त्त परमेश्‍वरामुळेच तुमचे जीवन वाहते रहाते. परमेश्‍वरावर असलेला विश्‍वास आणि श्रद्धा हे नैसर्गिकच असते. मग तुम्ही परमेश्‍वर कुणालाही माना. निसर्गाला, अज्ञात शक्‍त्तीला आपण करत असलेल्या कामाला, आपल्यात असलेल्या मानवतेला कशालाही आपण ईश्‍वर मानतो.

प्रत्येकाची ईश्‍वराची संकल्पना वेगवेगळीअसू शकते. बहुतेकवेळा माणसाला दु:खातच परमेश्‍वराची आठवण येते. तो एकतर त्याला शरण जाऊन दु:ख दूर करण्यासाठी त्याचा धावा करतो किंवा त्याला दोष तर देतो. अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्‍त्ती आपल्याला आजूबाजूला पहावयास मिळतात. बऱ्याचवेळा आत्मविश्‍वास नसतो किंवा दु:खाशी दोन हात करायचे धाडस नसते. मग अशावेळी आततायीपणाचा, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य सुद्धा संपवले जाते. पण जगात अशाही व्यक्‍त्ती असतात की ज्याकोणतेही आणि कितीही मोठे संकट आले तरी प्रयत्नांची कास न सोडता संकटाशी सामना करत राहतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मग प्रयत्नांती परमेश्‍वर या न्यायाने त्यांचे आयुष्य यशाने उजळून निघते. काही व्यक्‍त्तींची तर गोष्टच वेगळी असते. आयुष्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीकडे ते सकारात्मकतेनेच पाहतात. अमेरिकेच्या सर्वोच्च मानांकन मिळालेल्या अद्वितीय विंबल्डनपटू ऑर्थर ऍश याच्यावर 1983 मध्ये त्याच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली. आणि उपचारातील काही चुकांमुळे त्याच्यावर गंभीर आजार ओढवला. तो विंबल्डनमधला जगज्जेताच होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचे त्याच्यावर खूप प्रेम होते. ऍशच्या आजारामुळे त्याचे चाहते खूप दु:खी होते. रोज त्याला शेकडो पत्र यायची. त्यातल्याच एका पत्रात एका चाहत्याने लिहिले होते, परमेश्‍वराने या असाध्य आजारासाठी तुलाच का निवडले?

आर्थर ऍशने यावर दिलेले उत्तर अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे होते. सगळ्या जगात पाच कोटी मुले टेनिस खेळणे सुरु करतात. त्यातली पन्नास लाख खेळायला शिकतात. पाच लाख व्यावसायिक टेनिस खेळतात. बाकीचे खेळतात पण छंद म्हणून. पन्नास हजार पहिल्या पायरीपर्यंत पोहोचतात. पाच हजार ग्रॅन्ड स्लॅम पर्यंत जातात. विंबल्डन पर्यंत पोहोचतात किती? फक्‍त्त पन्नास. चारच जातात उपांत्य फेरीत आणि फक्‍त्त दोन अंतिम फेरीत. विंबल्डन चषक तर एकालाच मिळतो. मग तो अभिमानाने उंच धरताना देवाला मी विचारले का? हे मलाच का मिळाले म्हणून. मग आज असाध्य व्याधीला, असह्य वेदनेला तोंड देताना मी त्या परमेश्‍वराला विचारणे योग्य आहे का, हे मलाच का म्हणून? प्रत्येकाने आपल्याकडे असलेल्या गोष्टींची यादी करावी. नसलेल्या गोष्टींच्या यादीपेक्षा ही यादी कितीतरी मोठी होईल.

परमेश्‍वराने आपल्याला दिलेले आयुष्य, धडधाकट शरीर, त्यात असलेली बुद्धी, आत्मविश्‍वास, इच्छाशक्‍त्ती, आपल्यावर प्रेम करणारे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी शिवाय परमेश्‍वराने निसर्गात सुद्धा मनाला आनंद गोष्टींची रेलचेल केली आहे. या सगळ्या गोष्टी मनाला टॉनिक सारख्या उपयोगी पडतात. कवी मंगेश पाडगावकरांच्या शब्दात सांगायचे तर, सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की, गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)