सांगलीत दोघांचा मृत्यू; आणखी सहा नवे रुग्ण

सांगली (प्रतिनिधी) – सांगलीमधील लक्ष्मीनगर येथील करोनावर मात केलेले 52 वर्षीय व्यक्ती आणि मुंबईहून विटा येथे आलेल्या एका 72 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सांगलीतील व्यक्ती करोना मुक्त झाली होती. तर विटा येथे आलेल्या व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. दरम्यान जिल्ह्यात आणखी पाच जणांना करोनाची लागण झाली आहे.

साखर कारखान्याजवळील लक्ष्मीनगर येथील 52 वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली होती. परंतु त्यांची दोन दिवसांपूर्वी पुन्हा स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यांना फुफ्फुसाचा टीबी असल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. शनिवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. मुंबईहून दि.23 रोजी विटा येथे 72 वर्षीय वृद्ध व्यक्ती आली होती. त्यांना न्युमोनिया झाल्याने त्यांचे स्वास्थ बिघडले होते. त्यांमुळे त्यांना तत्काळ मिरज करोना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा देखील शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तसेच या व्यक्तीची हृदय शस्त्रक्रिया देखील झाली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान या व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. दरम्यान आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील दोघांचा चाचणी अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. संबंधीत व्यक्ती मुंबई दौरा करुन आल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच शनिवारी मध्यरात्री आणखी चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे, वाळवा तालुक्यातील आष्टा, आटपाडी तालुक्यातील जांभुळणी आणि शिराळा तालुक्यातील मोहरे येथील चार जणांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या 80 झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.