सहाय्यक आयुक्‍तांना परत पाठवा! नगरसेविका मुंढे

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील दरी वाढतच चालली आहे. शिक्षण समिती प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या पाठोपाठ आता सहाय्यक आयुक्‍त स्मिता झगडे यांना राज्य सरकारच्या सेवेत परत पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका उषा मुंढे यांनी केली आहे.

समाजातील विविध घटकांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणारा महापालिकेतील नागरवस्ती विभाग महत्वाचा विभाग मानला जातो. या विभागामार्फत शहरातील बचत गट, विधवा महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. या विभागाच्या सहाय्यक आयुक्‍त स्मिता झगडे यांना त्यांच्या विभागाविषयी कोणतीही आकडेवारी माहीत नाहीत. या विभागाचे महत्वच झगडे यांच्या लक्षात येत नाही. त्यांचे येथे काहीच काम नाही आणि त्या कामच करत नसल्याचे गंभीर आरोप करत झगडे यांना राज्यसेवेत परत पाठविण्याची मागणी जैव-विविधता समितीच्या सभापती उषा मुंढे यांनी केली आहे.

महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची नुकतीच बैठक पार पडली. या सभेत उषा मुंढे यांनी विविध प्रश्‍न विचारले. त्यापैकी एकाही प्रश्‍नाचे झगडे यांना उत्तर देता आले नाही. त्या निरुत्तर झाल्या. त्यामुळे मुंढे चांगल्याच आक्रमक झाल्या. त्यांनी झगडे यांना राज्य सेवेत परत पाठविण्याची मागणी केली. याबाबत पत्रकारांशी बोलताना उषा मुंढे म्हणाल्या, महापालिकेतील नागरवस्ती विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. किती महिलांना वाहन चालविण्याचा परवाना मिळाला आहे. त्यासाठी किती अर्ज आले होते. किती पात्र झाले आहेत. याची यादी मागितली असता या विभागाच्या सहाय्यक आयुक्‍त स्मिता झगडे यांना ही माहिती देता आली नाही. एक वर्षात किती बचत गटाला अनुदान दिले, किती अपात्र झाले. याची देखील त्यांना माहिती देता आली नाही. माहिती असणारे अधिकारी रजेवर असल्याचे सांगितले गेले. परंतु, विभागप्रमुख म्हणून त्यांना सर्व माहिती असणे आवश्‍यक आहे. बैठकीला येताना माहिती घेऊन येणे त्यांचे कर्तव्य आहे. त्या अनेक दिवस रजेवर असतात. मग यांच्याकडे माहिती कशी असणार? वरिष्ठांच्या रजा पाहून त्यांच्यानंतरचे अधिकारी देखील रजेवर जात आहेत. नागरवस्ती विभाग हा महत्वाचा विभाग असताना अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना लाभ मिळत नाही. महिला बचत गटाची कामे होत नाहीत. विधवा महिलांची कामे रखडतात, असे गंभीर आरोप मुंढे यांच्याकडून करण्यात आले.
शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांचादेखील असाच अनुभव महापौर राहुल जाधव यांना आला होता. कोणताही प्रश्‍न विचारला असता त्यांच्याकडून “माहिती घेऊन सांगते’ असे एकाच पठडीतील उत्तर मिळाल्याने महापौर जाधव चांगलेच संतापले होते. महापालिका सर्वसाधारण सभेत त्यांच्या बदलीची उपसूचना मंजुर करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या बदलीचा प्रस्ताव शिक्षण समिती सभेत मंजुर करुन, तो सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, हा विषय तहकुब केल्याने शिंदे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

झगडे यांच्या कार्यपद्धतीला आक्षेप
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत रुजू होण्याची झगडे यांची पहिली संधी हुकली होती. डॉ. प्रविण आष्टीकर यांच्या रुजू होण्याच्यावेळी ही संधी हुकली होती. त्यानंतर मात्र महापालिकेत पोसिंटग मिळविण्यात यशस्वी ठरल्या. त्यानंतर मात्र त्यांच्या कार्यपद्धतीला लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला आहे. सर्वसाधारण सभेतच सीमा सावले यांनी झगडे यांच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले होते. त्यानंतर आता पुन्हा उषा मुंढे यांनी झगडे यांच्या कार्यपद्धतीला आक्षेप गेत, थेट राज्य शासनाच्या सेवेत परत पाठविण्याची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.