सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात

  • बहुजन ब्रिगेडचे महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे मागणी निवेदन

अकलूज – महाराष्ट्रात येथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरचा वापर करूनच घेण्यात याव्यात, असे बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या निवेदनामध्ये मागणी केली आहे.
महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. कारण इव्हीएम मशीनमुळे जनतेमध्ये अविश्वास आणि पेच निर्माण झालेला आहे. या मशीनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये मशीनचा बिघाड होणे, एका उमेदवाराला मतदान केले म्हणजे दुसऱ्याच उमेदवाराला मत जाणे, स्वतः उमेदवाराने स्वतःला केलेले मतदान न दाखवणे, अशा प्रकारांमुळे इव्हीएम मशीनबद्दल जनतेच्या आणि मतदारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. या मशीनच्या घोटाळ्याबद्दल आणि छेडछाडीबद्दल अनेक प्रश्न उदभवत आहेत. या मशीनच्या माध्यमातून ज्या उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा नसताना त्या उमेदवाराला आपोआप मतदान होत आहे, अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या व मतदारांच्या मनात निर्माण झालेली आहे.
जगातील नामांकित देशांनी इव्हीहम मशीनचा वापर टाळून बॅलेट पेपरच्या साह्याने निवडणुका घेण्याचे निर्णय घेतलेले आहेत. या मशीनमध्ये घोटाळा करणे शक्‍य असल्यानेच या देशांनी हा निर्णय घेतलेला असावा. त्यामुळे इथून पुढे महाराष्ट्रासहित सोलापूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी बहुजन ब्रिगेडने दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे. सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जनतेच्या या मागणीचा आदर करून, या महाराष्ट्रात सर्वत्र बॅलेट पेपरचा वापर करून येथून पुढच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अन्यथा सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन उभा करावे लागेल, असा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेने महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयोगाला दिला आहे, यावेळी बहुजन ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष किरण साठे, मनसे तालुका अध्यक्ष बापू वाघमारे, तालुका अध्यक्ष आकाश होनमाने, उपाध्यक्ष अजिनाथ साठे, बहुजन ब्रिगेड शहर अध्यक्ष आनंद मिसाळ, कन्हैया ठोंबरे, संघटक उदय कांबळे, भारत वाघमारे, मनसेचे अकलूज शहर अध्यक्ष सुदाम आवारे, उपाध्यक्ष विकी केसकर,सरचिटणीस सोमनाथ शेळके, संघटक नाना खंडागळे, मधुकर चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)