सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर समाधान

के. वेंकटेशम : राजकीय हेतूने कारवाई केली नसल्याचे स्पष्ट
पुणे – एल्गार परिषद प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेत अचूक तपास केला आहे. तीन महिने विविध पुराव्याचे विश्‍लेषण केले आणि ते आरोपींवर कारवाई करण्याच्या निष्कर्षाप्रत पोहोचले. त्यानंतर घरझडती घेत सापडलेल्या पुराव्यावरून ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आरोपींना अटक करण्याची कारवाई केली. यामुळे उच्च न्यायालयाने ही अटक राजकीय हेतूने केली नसल्याचे स्पष्ट केल्याने समाधान असल्याची प्रतिक्रीया पुणे शहर पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी दिली.

नक्षली चळवळीशी संबंध असल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, ही अटक राजकिय हेतूने केलेली नाही तसेच याप्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची गरज नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यावर बोलताना वेंकटेशम म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे पुणे शहर पोलीस दलाच्या तपासाधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली आहे. या प्रकरणाचे तपासाधिकारी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त सुहास बावचे तसेच तत्कालिन सहआयुक्त रवींद्र कदम यांचे अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे शहर पोलीस या प्रकरणाचा मोठ्या प्रमाणात तपास करीत आहे. तसेच पुरावे गोळा करून न्यायालयात वेळेवर आरोपपत्र दाखल करणार आहे. आरोपीविरोधात सबळ पुरावे सापडले आहेत. त्यातून माओवादी चळवळीमध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये नक्षली नेत्यांशी संवाद, शस्त्रांच्या प्रकारांबाबत चर्चा, मनुष्यबळ तसेच नवे नेतृत्व जंगलात पाठविणे, पैसा पुरविणे आदींचा समावेश आहे. दरम्यान, चार आठवड्यानंतर आम्ही न्यायालयाकडे अटकेसंदर्भात मागणी करू तसेच याप्रकरणाच्या पुढील तपासासाठी कोठडी मिळवू, असा आशावाद डॉ. वेंकटेशम यांनी व्यक्त केला.

गरज पडल्यास पुन्हा घरावर छापे टाकू
आरोपींच्या घर झडतीदरम्यान सापडलेल्या पुराव्यांचे विश्‍लेषण सुरू आहे. तसेच, या प्रकरणात आणखी पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात आहे. गरज पडली तर पुन्हा घरावर छापे टाकू. याप्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्‍यता आहे का? यावर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र, यापुढेही नक्षली संबंधावरून संशयितांवर कारवाई सुरू राहणार असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)