सर्जापूर प्राथमिक शाळेला साडेतीन लाखांची मदत

ग्रामस्थांच्या मदतीने शाळेचा कायापालट

कुडाळ – उद्याचे भवितव्य घडविणाऱ्या, देशाचा सुसंस्कृत आदर्श नागरिक निर्माण करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या ज्ञानमंदिरासाठी सर्जापूरवासियांनी मदतीचा हात दिला अन्‌ शाळेचा चेहरामोहराच बदलला. गावातील दानशूर व्यक्ती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सेवानिवृत्त विकास अधिकारी विश्‍वासराव बोराटे यांनी सर्जापुरच्या प्राथमिक शाळेकरिता सुमारे दीड लाख रुपये खर्च करून पेव्हर ब्लॉक व किचन शेडची फारशी बदलून दिली. त्यांच्या या दातृत्व भावनेने समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. इतरांनीही यांचा आदर्श घेऊन समाजसहकार्यासाठी प्रयत्न करावेत असे मत माजी सरपंच प्रकाशराव मोहिते यांनी व्यक्त केले.

सर्जापूर, ता. जावळी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी शाळेसाठीच्या या सुविधा ग्रामस्थांच्या उपस्थितीत समर्पित करण्यात आल्या. पुढे ते म्हणाले, अलीकडच्या काळात इंग्रजी माध्यमांच्या स्पर्धेत गावातील प्राथमिक शाळाही कुठेच कमी पडत नाहीत. विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यासाठी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक यांची सतत धडपड आहे. या कार्यात गावातील युवावर्गाचे योगदान मिळत आहे. मुख्याध्यापक पटेल म्हणाले, शाळेसाठी वैभव बोराटे यांच्या माध्यमातून थिसेन कृप इंडस्ट्रीज पुणे यांच्यामार्फत ग्रंथालयासाठी कपाटे, पुस्तके व शालोपयोगी साहित्य देण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर व्हावा या हेतूने सुभाष मापारी व मोहन मोहिते यांनी संगणकाची उपलब्धता करून दिली.

शाळेने आय. एस. ओ. मानांकन व शालासिद्धी “अ’ श्रेणी मिळवलेली असून यासाठी येथील ग्रामस्थ, आजी शिक्षक सर्वांचेच सहकार्य लाभले. जावली तालुक्‍यातील एक आदर्श प्राथमिक शाळा निर्माण होण्यात येथील ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आहे. गावच्या या योनदानाबद्दल गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, विस्तारधिकारी कल्पना तोडरमल, केंद्रप्रमुख अरविंद दळवी, मुख्याध्यापक शकील पटेल, उपशिक्षिका अश्‍विनी बोराटे यांनी आभार मानले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सुशीला जाधव, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)