सराव सामना चारऐवजी तीन दिवसांतच आटपणार 

ओव्हल कौंटी मैदानावरील खेळपट्टी व आऊटफील्डवर भारतीय संघ नाराज 
चेम्सफोर्ड – इंग्लंडविरुद्ध अत्यंत आव्हानात्मक अशा कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी आयोजित करण्यात आलेला एकमेव सराव सामना आता चारऐवजी तीनच दिवसांचा होणार आहे. हा सराव सामना होणार असलेल्या ओव्हल कौंटी मैदानावरील खेळपट्टी आणि आऊटफील्डच्या अवस्थेवरून भारतीय संघाने तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे.
आज होणारा भारत विरुद्ध इसेक्‍स हा सराव सामना चार दिवसांचा होता. परंतु आता हा सामना केवळ तीन दिवसांचाच होणार आहे. काल दुपारच्या सराव सत्रात खेळपट्टी व मैदानाची स्थिती पाहून भारतीय संघव्यवस्थापनाने सराव सामना न खेळण्याचाच पवित्रा घेतला होता. अखेर अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडींनंतर ओव्हलच्या ग्राऊंड स्टाफने भारतीय संघाच्या मागणीनुसार खेळपट्टीत बदल करण्यास मान्यता दिल्याने हा सामना खेळण्यास भारताने मान्यता दिली.

त्याआधी ओव्हल मैदानावरील सराव सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर भरपूर हिरवळ पाहून भारतीय कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री संतप्त झाले होते. त्यातच आऊटफील्डवर अजिबात हिरवळ नसल्याचे पाहून त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त केली. रवी शास्त्री यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि अशी खेळपट्टी व आऊटफील्डवर खेळून भारतीय खेळाडूंना दुखापती होण्याची शक्‍यता असल्याचेही त्यांच्या निदर्शनाला आणले.
सहप्रशिक्षक संजय बांगर व गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनीही ग्राऊंड स्टाफशी चर्चा केली. त्यानंतर भारतीय संघाच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे ग्राऊंड स्टाफच्या वरिष्ठ सदस्याने सांगितले. परंतु या सर्व घटनाक्रमाबद्दल ओव्हल कौंटीच्या वतीने नंतर अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान भारतीय खेळाडूंनी काल सुमारे चार तासांच्या सत्रात सराव केला. त्यात जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा व महंमद शमी यांनी दीर्घ स्पेलमध्ये गोलंदाजी केली. शिखर धवनने आखूड टप्प्याच्या चेंडूवर सराव केला. तर विराटने थ्रो-डाऊनचा सामना केला. लोकेश राहुल व चेतेश्‍वर पुजारा यांच्या पलंदाजीनंतर बाकी फलंदाजांनाही सराव केला. भारतीय संघाची दुसरी तुकडी येथे दाखल झाली. त्यातून आलेल्या रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, करुण नायर आदी खेळाडूंचे सर्वांनी स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)