सराटीतील दुष्काळाने वैष्णवांची होणार पंचाईत?

दुष्काळामुळे नीरा नदी कोरडी : टॅंकरद्वारे होतोय पुरवठा

नीरा नरसिंहपूर – जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वैष्णवांची सराटी (ता. इंदापूर) येथे पाण्याअभावी अंघोळीची पंचाईत होणार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सराटीला टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे लाखो वैष्णवांचे लक्ष लागले आहे.

जगतद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे सोमवारी (दि. 24) प्रस्थान झाले. पालखीचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्‍काम सराटी येथे परंपरेप्रमाणे असतो. महाराजांच्या पादुकांना नीरा नदीच्या पाण्याने अंघोळ घातली जाते. परंतु, मागील पाच वर्षांत नीरा नदी पाण्याअभावी सतत कोरडी पडली आहे. त्यामुळे प्रशासन पादुका स्नानासाठी टॅंकरची सोय करते. या वर्षीही जून महिना संपत आला तरी पाऊस पडला नाही. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तुकाराम महाराज पालखीचा सराटी येथे शनिवार सहा जुलै रोजी मुक्काम आहे. बातमी दोन तर सात जुलैला पादुकांचे नीरा स्नान पुन्हा टॅकरच्या पाण्याने करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. परंतू पालखी सोहळ्यात असणारे लाखो वैष्णवांच्या आंघोळीसाठी नेमकी कोणती सोय करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे नीरा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे नदी काठावरील सराटी सह लुमेवाडी, निरनिमगाव, भगतवाडी, पिठेवाडी, लाखेवाडी गावांना टॅकरने पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तर अकलूज गावालाही चार ते पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे.

त्यामुळे पालखीच्या सराटी मुक्‍कामी व दुसऱ्या दिवसाच्या मुक्‍कामी अकलूज येथेही पाणीटंचाईमुळे टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे लाखो वैष्णवांच्या आंघोळीचा प्रश्‍न प्रशासनासाठी डोकेदुखीचा ठरण्याची
शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.