सराईत पंचांचे न्यायालयीन यंत्रणेसमोर आव्हान

– विजयकुमार कुलकर्णी

पुणे – सर्वसामान्य नागरिक पंच आणि साक्षीदार व्हायला धजावत नाहीत. परिणामी नाईलाजाने पोलिसांना सराईत पंचाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या खटल्यांमध्ये सराईत पंचाचीच चलती असल्याचे शिवाजीनगर न्यायालयातील चित्र आहे. व्यावसायिक साक्षीदार आणि पंचांना “बिदागी’ दिल्याशिवाय पुढे कामाला गती येत नाही. बऱ्याच वेळा चक्‍क पोलिसांचे काम अडते. पोलीसच “भत्ता’ देऊन एकाच पंचाला वेगवेगळ्या खटल्यांमध्ये उभे करतात. हे पंच फितूर होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे सराईत पंचाचेच न्यायालयीन यंत्रणेसमोर आव्हान उभे केले आहे. कायद्यातून पळवाटा शोधून पंचांची हेराफेरी पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढविणारी ठरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुन्हा घडल्यानंतर घटना आणि घटनास्थळाची इत्यंभूत माहिती सांगण्यासाठी न्यायालयात पंच साक्षीदार महत्त्वाचा असतो. पंच साक्षीदाराने दिलेल्या योग्य साक्षीमुळे शिक्षा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, पंच होण्यास नागरिक टाळाटाळ करत असतात. बऱ्याचवेळा कायद्याचा सासेमिरा टाळण्यासाठी आणि वारंवार साक्ष देण्याची नसती कटकट नको, या हेतूने गुन्ह्यानंतर साक्षीदार पुढे येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे पोलिसांना व्यावसायिक पंचांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे येथील शिवाजीनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयात एकच व्यक्‍ती हजारो आणि शेकडो खटल्यात पंच किंवा साक्षीदार असल्याचे दिसून येत आहे. यात धक्‍कादायक बाब म्हणजे, एक किंवा दोघे तर हजारहून अधिक खटल्यात पंच किंवा साक्षीदार आहेत. शिवाजीनगर न्यायालयात व्यावसायिक पंच, साक्षीदारांची संख्या दहा ते पंधराच्या आसपास आहे.

न्यायालयात पोलिसांच्याच बाजूने साक्ष द्यायची, याचे कोणतेही बंधन त्यांना नाही. त्यामुळे आरोपींसोबत बैठका करून त्यांच्या बाजूने साक्ष देण्यास हे साक्षीदार पटाईत आहेत. पंच फितूर झाल्यास त्याचा खटल्यावर परिणाम होतो. पुराव्यांअभावी अनेक आरोपी निर्दोष सुटतात. प्रत्येक तारखेस हजर राहण्यासाठी त्या खटल्याचे स्वरूप पाहून 200 रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत या व्यावसायिक पंचांचे अघोषित दरपत्रक आहे. त्यामुळे या पंचांना ही रक्‍कम पोलीस देतात. ही “बिदागी’ घेऊनही ते पोलिसांच्या बाजूने साक्ष देतील, याची शाश्‍वती नसल्याने अनेक निकाल पोलिसांच्या विरोधात गेले आहेत. तर बचाव पक्षांच्या वकिलांनाही या पंचाबाबत माहिती झाली आहे. त्या पंचांना हजार रुपये दिले की, विषयच संपला, असे खासगीमध्ये अनेक वकील सांगत असतात. फितुरी टाळावी, यासाठी पोलीस फिर्यादीलाच पंच उपलब्ध करून देण्याची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे बऱ्याचवेळा फिर्यादीला पंचाचा किंवा साक्षीदारांचा शोध घ्यावा लागत आहे.

शिवाजीनगर न्यायालयात साक्षीदारांची दुकानदारी जोरात सुरू आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला त्यांच्यावर भिस्त ठेवावी लागत आहे. एकीकडे गुन्हा दाखल करायचा, त्यानंतर पंच आणि साक्षीदारांचा शोध घ्यायचा, अशी दुहेरी कसरत पोलिसांना करावी लागत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यातच हे पंच फितुर होत असल्याने त्यांनी न्यायालयीन यंत्रणेपुढे आव्हान उभे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)