सरपंचांवरील वाढते हल्ले चिंताजनक

महाळुंगे इंगळे – विकास कामांमध्ये सदैव अग्रभागी राहून गावच्या गावासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रथम नागरिक म्हणून नावलौकिक असलेल्या सरपंचांवरील वाढते प्राणघातक हल्ले ही चिंताजनक बाब होत चालली आहे. मोई येथील महिला सरपंचांच्या गाडीवर दारू विक्रेत्यांनी केलेली दगडफेक व शेलगाव येथे किरकोळ कारणावरून तरुण सरपंचावर लोखंडी रॉडने केलेला प्राणघातक हल्ला या घटनांनी हा प्रकार अधोरेखित होत आहे. असे हल्ले होणे म्हणजे गावातील विकासकामांना खीळ बसल्याचे मानले जात आहे.

दारू विक्री बंद करा, असे सांगण्यासाठी गेलेल्या मोई (ता. खेड) गावच्या महिला सरपंच पल्लवी संतोष गवारे यांच्या गाडीवर चिडून दारू विक्रेत्यांनीच दगडफेक केल्याचा प्रकार घडला. या दगडफेकीत गवारे यांच्या गाडीच्या काचा फुटून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, गवारे यांनी वेळीच सावधगिरी बाळगल्याने होणारा संभाव्य धोका टळला. या प्रकरणी माथेफिरू दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यामुळे गाडीचे झालेले आर्थिक नुकसान भरून मिळेल का?, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

तसेच चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील शेलगाव (ता. खेड) येथेही असाच एक प्रकार समोर आला आहे. पाण्याचे आरो फिल्टर प्लांटचा धनादेश आम्हाला विश्‍वासात न घेता व न विचारता काढल्याच्या किरकोळ कारणावरून चिडलेल्या दोघांनी संगनमताने सरपंचांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने रणजीत हांडे व रमेश हांडे यांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. नागेश नवनाथ आवटे या शेलगावच्या सरपंचांना जबर मारहाण झाली. नागेश यांचे वडील नवनाथ हनुमंत आवटे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. चाकण पोलिसांनी रणजीत व रमेश यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र, कायदा त्यांना काय सजा देईल, हा नंतरचा भाग आला. असे प्रकार घडणे ही मात्र चिंताजनक बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)