सरदार दाभाडेंच्या तळेगावच “बनेश्वर मंदिर”

पेन्शनरांच शहर, पुणे-मुंबई या दोन शहरांमधलं एक महत्वाचं मध्यवर्ती ठिकाण, पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना इनामात मिळालेलं गाव. अशी पुणे जिल्ह्यातील मावळतालुक्यात असणाऱ्या तळेगावची ओळख बहुसंख्यांना आहे. नव्याने विकसित होऊ घातलेली औद्योगिक वसाहत, शैक्षणिक संकुले. यामुळे जुन्या तळेगावच रूप झपाट्याने पालटू लागलं आहे. एकेकाळी इतिहासात प्रसिद्ध असलेलं हे गाव आता शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करू लागले आहे. तरीपण येथील काही ठिकाणे आणि स्थान मात्र अजूनही जुन्या काळाची साक्ष देतउभी आहेत. यातलच एक ठिकाण म्हणजे शंभू महादेवाचं बनेश्वर मंदिर!

बनेश्वर या नावाच आणखी एक मंदिर मुंबई-बेंगरूळमहामार्गावर नसरापूर (जि.पुणे) येथे पहायला मिळते. पण प्रस्तुत लेखातलं बनेश्वर मंदिर म्हणजे सरदार दाभाडे यांच्या काळात अठराव्या शतकात उभारले गेलेलं. त्यामुळेच या मंदिराला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे. म्हणूनच एका मंदिराची सुंदर अनुभूती घेण्यासाठी आपला मोर्चा तळेगावडे वळवायचा. तळेगावला येण्यासाठी लोहमार्ग आणि रस्तेमार्ग असे दोन्हीही पर्याय उपलब्ध आहेत. तळेगावात आलो की, बनेश्वर मंदिराचा रस्ता विचारून मंदिराच्या समोर यायचे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंदिराच्या अगोदरच उजव्या बाजूस इतिहासाची सोनेरी पाने दिसायला सुरुवात होते. यातलंच एक सोनेरी पान म्हणजे पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांची समाधी. पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी असलेल्या याच उमाबाईनी १७३२ साली खान-ए-खान जोरावर खान बाबी याचा गुजरातेत जाऊन पराभव केला. एका महिला योद्ध्याची ही अतुलनीय कामगिरी पाहून छत्रपती शाहू महाराजांनी उमाबाईना सातारायेथे सोन्याचे तोडे, रत्नजडीत तलवारव मानाची वस्त्रे देऊन सन्मानित केले. या अशा योद्ध्याची समाधी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच दिसते. या समाधीला वंदन करून आपण बनेश्वरच्या आवारात पाउल टाकायचे.गर्द झाडीत असलेल्या बनेश्वराच देऊळ आता उलगडायला लागते.

छोटे बांधीव तळे(काही अभ्यासक याला पुष्कर्णी देखील म्हणतात ) नंदिमंडप, सभामंडप व गाभारा अशी या मंदिराची ढोबळ रचना आहे. या तळ्यावर पाणी उपसणाऱ्या मोटीसाठीची जागाही दिसून येते. या तळ्यातील पाणी शेतीसाठी बहुधा वापरले जात असण्याची शक्यता आहे. परंतु नंतरच्या काळात यातलं पाणी वापरण्याजोगे नसल्यामुळे या तळ्याला ‘नासके तळे’ असही म्हटलं जायचं. या तळ्यात उतरण्यासाठी चहूबाजूंनी पायऱ्या देखील बांधलेल्या  दिसतात. हे तळे पाहून झाले की मग येतो नदीमंडप. चार खांबांवर उभा असलेला हा संपूर्ण दगडात उभारला आहे. हा नंदिमंडप मुख्य मंदिराला न जोडता तो काहीसा अंतरावर उभारला आहे. यातील नंदीची मूर्ती तर त्याहूनही देखणी. रिवाजाप्रमाणे नंदीवर माथा टेकवून पूर्वाभिमुख असलेल्या बनेश्वर मंदिराच्या सभा मंडपात प्रवेश करायचा.

संपूर्ण दगडात उभारल्या गेलेल्या या मंदिराची स्थापत्य रचना खूपच आकर्षक आहे. सभामंडपात एकूण १६ खांब असून यातील १२ खांब हे दगडी भिंतीत आणि प्रवेशदार यांच्या बांधणीत सामावलेले दिसतातव उरलेले ४ खांबहे मधोमध पूर्णाकृती आहे. खांबावर विशेष नक्षीकाम जरी नसले तरी या खांबांना दिलेले चौकोनी आणि गोलाकार आकार मात्र पाहण्यासारखे आहे. सभा मंडपातील गाभाऱ्याच्या साठी असलेल्या प्रवेशदाराशेजारी दोन कोनाडी दिसतात. यामध्ये गणेश आणि हनुमानाच्या मुर्ती ठेवलेल्या दिसतात. सभामंडपांपासून छोट्याशा प्रवेशव्दारातून आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो. आतमध्ये खूपच सुंदर शिवपिंडी आहे. गाभाऱ्यातील धीरगंभीर वातावरण व थंडावा आवर्जून अनुभवावा असाच आहे. शिवपिंडीवर माथा टेकवून मग फेरीसाठी बाहेर यायचे. मंदिराच्या सभोवताली खूप झाडी असून मंदिराशेजारीच सरदार खंडेराव दाभाडे यांची समाधीही दिसते. मंदिराच्या गाभाऱ्यावर कळस अजूनही सुस्थितीत दिसतो. एकंदरीतच मंदिराच्या बांधकामावर मराठेशाही वास्तूस्थापत्याचा पगडा दिसून येतो. महाशिवरात्री आणि श्रावणात येथील पंचक्रोशीतून अनेक भाविक दर्शनासाठी येथे येत असतात.

अतिशय निसर्गरम्य वातावरणात उभं असलेलं हे मंदिर पाहणे म्हणजे आनंदयोग ठरावा. तळेगावचा ऐतिहासिक आणि वैभवसंपन्न वारसा असलेलं हे शंभू महादेवाचं मंदिर एकदा तरी वाट वाकडी करून पाहायलाच हवं.

– ओंकार वर्तले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)