सरकार कुचकामी असल्याचे जनतेला उमगले

बाळासाहेब पाटील : जनताच आता मतपेटीतून मन की बात सांगेल

ढेबेवाडी, दि. 11 (वार्ताहर) – गेल्या निवडणूकीत भाजपचे 282 खासदार निवडून आले होते. मात्र, त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत ही संख्या घटली. काही राज्यातील विधानसभेतील सत्ताही त्यांना गमवावी लागली. याचा स्पष्ट अर्थ होतो की, भाजपची लाट आता ओसरली आहे. हे सरकार कुचकामी असल्याचे जनतेलाही कळून चुकले आहे. त्यामुळे मतदारराजाच आता मतपेटीद्वारे आपली मनकी बात सांगतील, असे प्रतिपादन आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.
वसंतगड, ता. कराड येथे जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. उदयनराजे भोसले, आ. आनंदराव पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, कॉंग्रेसच्या प्रांतिक कार्यकारिणीचे सदस्य हिंदुराव पाटील, अजितराव चिखलीकर, निवासराव पाटील, पी. जी. पाटील, रघुनंदन बागवडे, पांडुरंग पाटील, शंकरराव पाटील, विजय चव्हाण, गिरीष पाटील, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, नरेश देसाई यांची उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले की, माझ्या नसलेल्या दहशतीचा विरोधकांकडून बऱ्याचदा बागुलबुवा केला जातो. मात्र हे लक्षात घ्या की, मी जर दहशत केली असती तर तुम्ही उमेदवारी अर्जही भरू शकला नसता. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत प्रत्येकाला स्वतःच निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यानुसारच निवडणूक होत असून राज्यघटनेचा आदर करून लोकशाहीत अर्थाने राजे असणाऱ्या जनतेने या निवडणुकीत केंद्रात परिवर्तन घडवावे.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले की, देशभक्तीचे सोंग करून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या ढोंगी व संधीसाधूना जनता या निवडणुकीत धडा शिकवेल. हिंदुराव पाटील यांचे भाषण झाले.
दरम्यान, सणबूर, ता. पाटण येथील प्रचार सभेस खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील, पाटण पंचायत समितीच्या सभापती उज्वला जाधव, सरपंच वनिता चव्हाण, उपसरपंच संदीप जाधव, उत्तमराव जाधव, पोपटराव खेडेकर, चंद्रकांत जाधव, रामचंद्र साळुंखे, सदाभाऊ साळुंखे, ऍड. ए. पी. पाटील, आदींसह लगतच्या सुतारवाडी, पावरवादी, विठ्ठलवाडी या गावांतीलकार्यकर्ते ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

स्वत:ला खासदार नव्हे तर मिलिटरी पोलिस समजातो
एम. पी. म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट असे रूढ असले तरी मी स्वतःला एम. पी. म्हणजे मिलिटरी पोलिस समजतो. मी स्वतः घामातून आणि कामातून उभा राहिलो आहे. मात्र विरोधकांकडे काहीच अजेंडा व विचारधारा नाही. त्यामुळे उसने अवसान आणून ते खोटे आरोप करीत आहेत, असेही उदयनराजे म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.