सरकारी व्यवहारातील मध्यस्थांचे उच्चाटन केले – पंतप्रधान

संबळपुर – सरकारी व्यवहारातील मध्यस्थांचे आपण उच्चाटन केले असून त्यामुळेच केंद्र सरकारचा निधी आता थेट गरीबांपर्यंत पोहचत आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील प्रचार सभेत बोलताना केला. ते म्हणाले की युपीए सरकारच्या काळात एक रूपयांतील केवळ पंधरापैसेच खालपर्यंत पोहचत होते पण आम्ही आता रूपया थेट नागरीकांच्या खात्यावरच जमा करतो त्यामुळे त्यात निधीची गळती होत नाही असेही त्यांनी नमूद केले.

कॉंग्रेसच्या राजवटीत अनेक घोटाळे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावाही त्यांनी केला. कॉंग्रेसच्या काळात साखर घोटाळा, रेशन घोटाळा, युरिया घोटाळा असे अनेक घोटाळे झाले. त्यामुळे लोक असाह्य बनले होते असे त्यांनी नमूद केले.केंद्र सरकारकडून मंजुर होणारा निधी पुर्ण स्वरूपात गरीबांपर्यंत नेण्याची खबरदारी या चौकीदाराने घेतली असे ते म्हणाले.ओडिशातील बीजेडी सरकारच्या कारभारावर टीका करताना ते म्हणाले की नवीन पटनाईक यांच्या सरकारने केवळ स्वताचीच चिंता केली. त्यांनी खाण घोटाळा आणि चिटफंड घोटाळ्यातील आरोपींना वाचवण्याचाच प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केला.

चौकीदाराच्या सरकारने भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केल्यानेच महाभेसळ आघाडीचे लोक आम्हाला सत्तेवरून घालवण्याच्या प्रयत्नात आहेत असा आरोपही त्यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.