सरकारी जागांवरील अतिक्रमण जमीनदोस्त

देहुरोड – सरकारी जागांवरील अतिक्रमणावर देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी दुपारी अचानक कारवाईचा बडगा उगारला. तसेच मोकळ्या मैदानात धार्मिक स्थळ बांधण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेला ओटा देखील हटवण्यात आला. त्याच बरोबर अनधिकृत फलकांवरही जप्तीची कारवाई केली. त्यामुळे खळबळ उडाली.

काही अतिक्रमण करणारांनी आपण स्वतःहून अतिक्रमण काढू, अशी तयारी दाखवल्यानंतर त्यांना वेळ देण्यात आली. दुपारी तीनला ते सायंकाळी सहापर्यंत कारवाई सुरू होती. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप, कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत ,अतिक्रमण विरोधी पथकाचे दहा जवान, आरोग्य निरीक्षक किरण गोंटे, स्थापत्य विभागीय अभियंता प्रवीण गायकवाड, अँथोनी टोनी, इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. एक जेसीबी, डंपर, माल मोटार, सुरक्षा रक्षक, बोर्डाच्या विविध विभागांतील तीसहून अधिक कर्मचारी कारवाईत होते. बघ्यांची मोठी गर्दी यावेळी झाली होती.

बोर्डाच्या हद्दीतील देहुरोड बाजार पेठेत संरक्षण विभागाच्या जागेवर गुरुद्वाराजवळ सुरू असलेल्या एका आरसीसी कामाचे वीट बांधकाम काढून काही कॉलम हटवण्यात आले. देहुरोड-मामुर्डी मुख्य रस्त्यालगत शितळानगर येथे संरक्षण विभागाच्या जागेवरील तीन पत्रा शेड, एक हॉटेल, दोन टपऱ्या, एक गॅरेज आणि एक वखार यावरही कारवाई केली. येथील अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करताना काही नागरिकांनी विरोध केला. ही जागा वन विभागाची असल्याचे सांगत कारवाई थांबवण्याची मागणी केली. मात्र बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी काहीही न ऐकता कारवाई केली.

अनधिकृत नळजोड
कारवाईत हॉटेलची जलवाहिनी फुटली. ते पाहत असताना हे नळजोड बोर्डाच्या मुख्य जल वाहिनीला छिद्र पाडून अनधिकृतपणे घेतल्याचे उघड झाले. झोपडपट्ट्यांत नळजोड घेण्यास प्रशासन परवानगी देत नसल्याने अनधिकृत नळजोड घ्यावे लागत असल्याची खंत काहींनी यावेळी व्यक्‍त केली. प्रशासन कारवाईत दुजाभाव करत असल्याचा काहींनी आरोप केला. नोटीस देऊन कारवाई करणे आवश्‍यक होते, परंतु प्रशासनाने अचानक कारवाई केली. बाजार पेठेत व भाजी मंडई परिसरात कारवाई होत नाही, केवळ आपल्यावरच कारवाई केली जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)