सरकारी कार्यालयातील “एसी’ वापरावर निर्बंध

पिंपरी – राज्य सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये वीजेची बचत करण्याच्या हेतूने सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व कार्यालयांना सूचना केल्या आहेत. त्यानुसर मानवी शरिरास आवश्‍यक आर्द्रता निर्माण होण्यासाठी कार्यालयामधील वातानुकूलन यंत्रणा 24 डिग्री सेल्सियस तापमानावर वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे हे तापमान मानवी शरिरास पोषक व “ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेस पूरक राहील, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.

वीजेच्या वाढत्या मागणीमुळे दिवसें-दिवस पुरवठा व मागणी यातील दरी वाढत आहे. यासाठी उपलब्ध वीजेचा कार्यक्षमतेने वापर करणे अत्यावश्‍यक झाले आहे. एका सर्वेक्षणानुसार देशात सकल घरेलू उत्पादनाच्या (जीडीपी) युनीट वाढीसाठी होणारा उर्जेचा वापर हा जपानच्या तुलनेत 3.7 पट, अमेरिकेच्या 1.55 पट तर अशियाच्या 1.47 एवढा आहे. त्यामुळे एक युनिटची बचत केल्यास 2.5 युनिटची निर्मिती केल्यासारखे आहे.
राज्य सरकारच्या विविध विभागांची राज्यभरात हजारो कार्यालये कार्यरत आहेत. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहे देखील आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यालयातील कर्मचाऱ्यांना व मुक्कामी अथवा बैठकीसाठी येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तिंना उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होऊ नये, याकरिता विश्रामगृहे आणि अधिकाऱ्यांच्या दालनाला वातानुकूलन यंत्रणा (एसी) बसविण्यात आली आहे. मात्र, ही यंत्रणा हिवाळा ऋतू वगळता अन्य दोन ऋतूंमध्ये देखील वापरली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. आठ महिन्यातील वापराला कोणाचाही आक्षेप नाही. मात्र, वातानुकूलन यंत्रणेचे तापमान 18 ते 20 डिग्री सेल्सियस एवढे ठेवले जाते. परिणामी मोठ्या प्रमाणावर वीज वापरली जाते. त्यामुळे शासनाला वीज शुल्काचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.

वीजेची 24 टक्‍के बचत शक्‍य
दरम्यान, केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीने सुचित केले आहे की, वातानुकुलित यंत्रणा 24 डिग्री सेल्सियस तापमानावर वापरले असता 24 टक्के वीजेची बचत होऊ शकते. तसेच हे तापमान मानवी शरिराला आवश्‍यक आर्द्रता आणि हवेच्या योग्य अभिसरणासाठी सर्वोत्तम आहे. याशिवाय बाहेरून येणाऱ्या व्यक्तिंना तापमानातील विषम बदलाला सामोरे जावे लागत नाही. याशिवाय हे तापमान वातावरणास पोषक व “ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेस पूरक राहत असल्याचे नमूद केले आहे. याकरिता वातानुकूलन यंत्रणेचे तापमान सुनिश्‍चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)