सरकारने पाच वर्षात संपूर्ण देशच गिळला

वडगांव हवेलीतील सभेत उदयनराजे यांचा घणाघात
कराड, दि. 7 (प्रतिनिधी) – एकटे उदयनराजे किंवा पृथ्वीराजबाबा काही करु शकत नाहीत. या देशाला महासत्तेकडे नेण्याची ताकद तुम्हा जनतेमध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही पूर्ण सत्ता बदलू शकत नाही, तोपर्यंत या देशातील धोरणे बदलणार नाहीत. आणि धोरण बदलणार नाही तोपर्यंत देश प्रगतीपथावर जाणार नाही. सध्याच्या सरकारने पाच वर्षांत संपूर्ण देशच गिळून टाकलाय, असा घणाघात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केला.
वडगाव हवेली (ता. कराड) येथे झालेल्या प्रचार सभेत उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, बंडानाना जगताप, अजितराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शिवराज मोरे, राजेश पाटील वाठारकर, ऍड. आनंदराव पाटील उंडाळकर, नगराध्यक्षा नीलमताई येडगे, विद्याताई थोरवडे, सुनील काटकर, काका धुमाळ, संग्राम बर्गे आदी प्रमुख उपस्थित होते.
या प्रचारसभेत उदयनराजे म्हणाले की, आज देशात केवळ नावापूर्तीच लोकशाही आहे. या सरकारने लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही चालवली असून त्यांनी देश अक्षरशः विकायला काढला आहे. हे सरकार उद्योगपतींची पाठराखण करणारे आहे. ब्रिटीश पुर्वकाळातील ईस्ट इंडीया कंपनीप्रमाणे बिझनेस इंडीया कंपनी या सरकारने आणली आहे. नैसर्गिक गॅस, ऑईल त्यांच्यामार्फतच जनतेला देण्याचे धोरण आखले. मात्र त्यामुळे उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ होत आहे. आणि जनतेला दाहीदिशा फिरावे लागत आहे. देशाच्या वार्षीक बजेटपेक्षाही कित्येक पटीने या धनदांडग्यांची मालमत्ता वाढत आहे. वास्तविक हा जनतेचा पैसा शासनाच्या तिजोरीतच असायला हवा होता. तसे झाले असते तर प्रत्येक नागरिकाला वैद्यकिय सुविधा आणि बालवाडीपासून उच्चस्तरापर्यंतचे शिक्षण मोफत मिळाले असते. ज्यांना घर नाही, त्यांना डोक्‍यावर छप्पर मिळाले असते. ज्यांना खायला अन्न नाही त्यांच्याकडे अन्नधान्य पोहच करता आले असते. मात्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे.
ज्या तरुणांकडे उमेद होती. ज्यांच्या ठायी महत्वाकांक्षा होती. त्या सर्वांच्या आशा, अपेक्षा पायाखाली चिरडून टाकण्याचे पातक या सरकारने केले आहे. तरुणाईच्या आकांक्षा मातीमोल करणारे हे पाप कोणत्या जन्मात फेडणार? असा सवाल करुन श्री. छ उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, तळे राखी तोच पाणी चाखी. पण या सरकारने पाच वर्षात तळीच शिल्लक ठेवली नाहीत. लोकांच्या हितासाठी वाट्टेल तेवढ्या केसेस अंगावर झेलण्याची माझी तयारी आहे. माझी कमिटमेंट जनतेशी आहे. मोदींच्या राजवटीत देशाचे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्यासाठी मतदारांनी एकजुटीने कॉंग्रेस व मित्रपक्षांचे सरकार स्थापन करण्यासाठी निर्धार करावा.

 

कृष्णा नदीसमोरील सेल्फीसाठी चार्जेस पडतील …..
देशातील नदी तळी विकण्याचे धोरण या सरकारने अवलंबले आहे. मोठमोठ्या उद्योजकांशी सरकारचे सतत करार सुरु असतात. त्यातून आपल्याजवळ असणारी कृष्णा नदीसुध्दा चुकणार नाही. नदी पात्रासमोर सेल्फी काढला तर त्यासाठी सुध्दा उद्योगपतींना पैसे देण्याची वेळ हे सरकार आपणावर आणेल. देशात परिवर्तन घडविण्यासाठी एकजुटीने जनतेने निर्णय घ्यावा. जोपर्यंत संपूर्ण सत्ता बदलत नाही, तोपर्यंत देशात लोकशाही नांदणार नाही. जनताच देशाचा खरा राजा आहेत. त्यामुळे सत्तांतराशिवाय गत्यंतर नाही, असेही खा. उदयनराजे भोसले यांनी यावेळी संगितले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.