समृद्ध जैवविविधतेने होईल स्मार्ट पर्यावरण संवर्धन- डॉ. राजेंद्र जगताप

पुणे स्मार्ट सिटी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने वृक्षारोपण

पुणे- पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि वन विभाग यांच्या सहकार्याने विद्यापीठ परिसरातील टेकडी व इतर भागांत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात कमवा शिका आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. राजेश पांडे, नगरसेवक आदित्य माळवे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रभाकर देसाई यावेळी उपस्थित होते. यावेळी करंज, सावर, कवट, जांभूळ, मोह आणि दोन प्रकारच्या चिंच अशा देशी प्रजातींची लागवड करून एकूण २४०० झाडांच्या वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पुणे स्मार्ट सिटीने गाठले.
पुणे स्मार्ट सिटी मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “केवळ हिरवळ दिसण्यासाठी वृक्षारोपण करणे हा उद्देश असू नये, तर खऱ्या अर्थाने पर्यावरण संवर्धन करण्यासाठी जैवविविधता टिकवणे व वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी आपला भौगोलिक परिसर लक्षात घेऊन देशी प्रजातीच्या वेगवेगळी वैशिष्ट्ये असलेली झाडे लावण्यावर आमचा भर आहे.

तसेच, स्मार्ट सिटीच्या कामांबाबत चर्चा घडवून आणणे आणि नागरिकांच्या समस्या, सूचना जाणून उपाययोजना करण्यासाठी त्या विचारात घेण्यासाठी आम्ही पुणे स्मार्ट सिटीच्या हॅकॅथॉन स्पर्धेसाठीही सहसंयोजनासाठी सहभागी होत आहोत.” ‘‘वृक्षारोपण आणि बीजगोळे निर्मिती अशा उपक्रमांच्या माध्यमातून पुणे स्मार्ट सिटी मिशनमध्ये थेट युवकांचा सहभाग वाढवता येणार आहे. पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत औंध, बाणेर, बालेवाडी या भागात विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्यात आता या हरित उपक्रमाची भर पडणार आहे,’’ असेही डॉ. जगताप यांनी सांगितले.

पर्यावरणासह निसर्गप्रेमाचे संवर्धन
कमवा शिका व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणाले, “गावाकडे अधूनमधून शेतात काम करायचो. शिक्षणासाठी शहरात आलो की काळ्या मातीशी संपर्क तुटतो, पण पुणे स्मार्ट सिटी आणि विद्यापीठामुळे वृक्षारोपणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मातीत राबण्याचा, घाम घाळण्याचा आगळावेगळा आनंद घेता आला. वृक्षारोपण करताना मातीत हात घालावा लागतो. झाडे हाताळताना आपण लावलेल्या झाडांशी आपले जणू एक नातेच जडते. याशिवाय अशा उपक्रमातून टीम वर्क चांगले होते.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)