“समुपदेशन’ केंद्राच्या माध्यमातून तब्बल 5 लाख नागरिकांची स्वाईन फ्लू तपासणी

376 संशयित रूग्णांना टॅमीफ्लू ; आतापर्यंत 40 स्वाईनफ्लूचे रूग्ण आढळून आले 

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 29 – जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून तब्बल 5 लाख नागरिकांची स्वाईन फ्लू तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 376 संशयित रूग्णांना टॅमीफ्लू गोळ्या देऊन उपचार देण्यात आले आहे. तसेच संसर्ग वाढू नये, यासाठी संशयीत रूग्णांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबतही डॉक्‍टरांकडून समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात स्वाईन फ्लू आजाराने उद्रेक केला असून, दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात 2 तर, सप्टेंबर महिन्यात 5 रूग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरले. आतापर्यंत 40 स्वाईनफ्लूचे रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षभरात 188 रूग्ण आढळून आले असून, 68 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने फ्लूचा वाढता उद्रेक लक्षात घेता जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये समुपदेशन केंद्र उभारले आहे. तसेच ज्या गावातील रूग्ण दगावला आहे, त्या गावाला भेट देऊन परिसराची पाहणी केली. नागरिकांमध्ये जनजागृती करून गावात स्वच्छता आणि औषध फवारणी करण्यात येत आहे.

1 जानेवारी ते 25 सप्टेंबर दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रावर 4 लाख 73 हजार 458 व्यक्तींची स्वाईन फ्लू तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 376 व्यक्ती संशयित म्हणून आढळले. त्यांना तत्काळ टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या पथकांनी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी स्वत: बारामती, ऊरूळी कांचन, पुरंदर यासह अन्य तालुक्‍यातील काही गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी सर्दी, खोकला, ताप असेल तर तत्काळ रूग्णालयात जावून उपचार घ्यावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे, तर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्तरावर समन्वय ठेवून सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे सभापती प्रविण माने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीलीप माने यांनी दिले आहेत.

——————————–
सर्दी, ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या ही लक्षणे आढळून आल्यास त्वरीत रूग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी. स्वाईन फ्लू संशयीत किंवा आजार झालेल्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. घरातल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. तसेच, नागरिकांनी घराबाहेर पडताना थोंडाला रूमाल किंवा मास्क बांधून बाहेर पडावे, वेळोवेळी स्वच्छ हात धुवावे, जेणेकरून स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढणार नाही.
– विश्‍वासराव देवकाते, अध्यक्ष – जिल्हा परिषद पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)