समुद्राच्या उधाणाचा सिंधुदुर्गच्या किनार पट्टीला फटका

सिंधुदुर्ग  – येथील  सागरी उधाणाचा जोरदार फटका आज जिल्ह्याच्या किनारपट्टी भागास बसला. समुद्राच्या अजस्र लाटांच्या मार्‍यामुळे उधाणाचे पाणी किनार्‍यालगत घुसल्याने मच्छीमारांच्या होड्यांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या नौका किनार्‍यावरून सुरक्षित ठिकाणी हलविण्यास मच्छीमारांची धावपळ उडाल्याचे दिसून आले.दुसरीकडे किल्ला प्रवासी होडी वाहतूक तसेच जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना देऊनही किल्ला प्रवासी होडी वाहतूक तसेच काही पर्यटन व्यावसायिकांनी जलक्रीडा व्यवसाय सुरू ठेवल्याचे दिसून आले. परिणामी पर्यटकांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे चित्र आहे.

भारतीय हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजानुसार काल जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वार्‍याचा जोर वाढला होता. त्यामुळे सतर्कतेचा इशारा मच्छीमार तसेच पर्यटन व्यावसायिकांना देण्यात आला होता. आजच्या दुसर्‍या दिवशी दुपारी अडीच वाजल्यापासून समुद्राच्या मोठ्या लाटा किनारपट्टी भागात उसळत असल्याचे दिसून आले. या समुद्री उधाणामुळे काही वेळातच किनार्‍यालगत लाटांचा मारा होऊन पाणी आत घुसले. त्यामुळे किनार्‍यावर काही अंतरावर उभ्या करून ठेवलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या होड्यांना धोका निर्माण झाला. उधाणाचे पाणी आत घुसत असल्याचे निदर्शनास येताच मच्छीमारांनी किनार्‍यावर धाव घेत आपल्या होड्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत किनार्‍यावरील होड्या बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

हवामान खात्याने केलेल्या सूचनेनुसार येथील मत्स्यव्यवसाय विभाग तसेच बंदर विभागाच्यावतीने मच्छीमार बांधवांना तसेच जलक्रीडा व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. यात मच्छीमारांनी आपला व्यवसाय बंद ठेवल्याचे दिसून आले. आज रविवार असल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. येथील बंदर जेटी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होती. यात किल्ला प्रवासी होडी वाहतूक सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. तसेच काही पर्यटन व्यावसायिकांनी आपले जलक्रीडा व्यवसाय सुरू ठेवल्याचे दिसून आले.  त्यामुळे पर्यटकांची सुरक्षितता रामभरोसेच असल्याचे चित्र होते. मच्छीमारांच्या मते पावसाळ्यापूर्वी असे समुद्रास उधाण येते. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात समुद्रास आलेल्या उधाणाचा फटका मासेमारी तसेच पर्यटन व्यवसायास बसल्याचे दिसून आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)