समीर कच्छी आता शहर पोलिसांच्या ताब्यात

सातारा, दि. 19 (प्रतिनिधी) –

शहरातील मटका किंग समीर कच्छी याला सातारा तालुका पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता झाली. मात्र, सातारा शहर पोलिसांनी त्याला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक केली आहे.

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, समीर कच्छी याच्यावर सातारा शहर, तालुका, शाहूपुरी या पोलीस ठाण्यांमध्ये 80 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

बहुतांश गुन्ह्यांमध्ये त्याला जामीन मिळाला आहे. मात्र, दहा गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना हवा होता. त्याचा शोध घेतल्यानंतर अखेर तो पुणे येथे असल्याची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती.

त्यानुसार हवालदार राजू मुलाणी, दादा परिहार यांनी पुण्यात जाऊन त्याला अटक केली. साताऱ्यात आणल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची जामिनावर मुक्तता झाली. मात्र, शहर पोलिसांनी लगेच त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली.

कच्छी झाला होता “मिस्टर इंडिया’
समीर कच्छी हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सातारा तालुका व शहर पोलिसांना हवा होता. मात्र, तो सापडत नसल्याने तालुका पोलिसांनी आकाश पाताळ एक केले होते. अखेर मोठ्या परिश्रमानंतर पोलिसांनी कच्छीला अटक केली. खरे तर गेल्या महिन्यात त्याच्या घरावर दगड मारून काचा फोडण्यात आल्याची तक्रार त्याच्या पत्नीने दिली होती. त्यावेळी थ्री फोर्थ आणि टी शर्ट घातलेला समीर कच्छी तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात बिनदिक्कत फिरत होता. तो सामान्य लोकांना दिसला तरी पोलिसांच्या नजरेस पडला नव्हता. त्यामुळे पोलिसांसाठी तो “मिस्टर इंडिया’ झाला होता का, अशी चर्चा आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here