समाज कल्याण वसाहतीची दुरावस्था

वर्षानुवर्षे होत नाही स्वच्छता ; कर्मचारी हवालदिल

पुणे  : समाज कल्याण विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये कमालीची दुरावस्था झाली आहे. क्वीन्स गार्डन जवळ असलेल्या या वसाहतीमधील अस्वच्छतेमुळे 12 मधील 7 कुटूंबे निघून गेली असून उर्वरीत पाच कुटूंबाना जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे. तसेच अस्वच्छता आणि दुरावस्थेमुळे आरोग्याची समस्याही या कर्मचाऱ्यांना सहन करावी लागत आहे.
क्वीन्स गार्डन येथे संत जनाबाई मुलींचे वसतिगृह कर्मचारी वसाहत आहे.

या ठिकाणी समाज कल्याण विभागात कार्यरत असलेले पाच कर्मचाऱ्यांची कुटूंबे रहाण्यास आहेत. या वसाहतीच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षात केवळ एकदा ते दोनदाच या वसाहतीमध्ये दुरूस्तीची कामे करण्यात आली आहे. या वसाहतीमधील रस्ते खराब झाले असून आसपासच्या परिसरात मोठया प्रमाणात गवत आणि झुडपे वाढली आहेत. तसेच घरांची दुरावस्थी मोठया प्रमाणात झाली आहे, तुटलेले दरवाजे, स्वच्छतागृहांची दुरावस्था, धोकादायक वीजमीटर, पडायला आलेल्या झाडांचा धोका, तसेच जाण्या येण्यासाठी चांगला रस्ताही नाही. या शिवाय, अनेक भंगारातील गाडयाही या वसाहतीच्या आवारात सडत पडल्या असून, ज्या काही घरांची दुरूस्ती करण्यात आलेली आहे. त्याचा राडारोडाही तसाच पडून आहे. त्यामुळे या वसाहतींकडे लक्ष देऊन तातडीन देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात यावीत अशी मागणी या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.