“समता’ च्या ठेवीत वीस कोटींनी वाढ

काका कोयटे यांची माहिती; मंदीच्या काळातही व्यवसायवृद्धी

कोपरगाव – समता नागरी सहकारी पतसंस्थेने तीस सप्टेंबरअखेरची पहिल्या सहामाहीची आर्थिक पत्रके जाहीर केली आहेत. संस्थेच्या ठेवी 383 कोटी रुपये तर कर्जे 267 कोटी रुपये झाली आहेत. सहा महिन्यांत पतसंस्थेच्या ठेवीत वीस कोटी रुपयांनी वाढ झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नागरी पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.
सध्या आर्थिक मंदी आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आर्थिक संस्थांना मंदीचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे मोठमोठ्या वित्तीय संस्थांच्या ठेववाढीचा वेगही कमी झाला आहे. अशा परिस्थितीत समता नागरी पतसंस्थेवरचा जनतेचा विश्‍वास कायम असल्याने गेल्या सहा महिन्यांत तब्बल 20 कोटी रुपयांनी ठेवी वाढल्या. पतसंस्थेला तीन कोटी 88 लाख रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेने 141 कोटी 52 लाख रुपयांची सुरक्षित गुंतवणूक करून ठेवीशी गुंतवणुकीचे प्रमाण 37 टक्के इतके राखले आहे. तसेच सी.डी. रेशो 69.76 टक्के राखून सहकार खात्याने घालून दिलेल्या सर्व आर्थिक निकषांची पूर्तता केली असल्याचे त्यांनी सांगितले. समता पतसंस्थेच्या एकूण कर्ज वाटपापैकी अल्प उत्पन्न गटातील साडेसात हजार नागरिकांना वीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्जवाटप करून समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय मिळवून दिला आहे. कोपरगाव मुख्य कार्यालयात मिनी एटीएम बसविले आहे. या एटीएममधून भारतातील कोणत्याही बॅंकेच्या कार्डवरचे पेमेंट मिळू शकते. अशाच प्रकारचे एटीएम आता सर्व शाखांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
कोयटे म्हणाले, “”महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत पतसंस्थांतील एक लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची योजना जाहीर केलेली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील पतसंस्थांना आता स्थैर्य निर्माण होणार आहे. बॅंका व पतसंस्थांच्या कामकाजातील फरक आता नगण्य स्वरूपाचा राहिला आहे. पतसंस्थेच्या एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण प्राप्त झाल्याने अशा संरक्षणप्राप्त पतसंस्थांमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त ठेवी ठेवाव्यात.”
बॅंकांच्या ठेवींना संरक्षण देण्याची जबाबदारी सहकार खात्याने कोयटे यांच्यावर सोपविली आहे. समता पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व सभासदांना त्याचा अभिमान असल्याचे संस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)