सफाई कर्मचारीप्रश्‍नी अधिकाऱ्यांची खरडपट्टी

– विधी समिती सभापतींची नाराजी : कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने देण्याचे आदेश

पिंपरी – शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने तात्काळ उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी विधी सभापती मोना कुलकर्णी यांनी केली आहे. तसेच, सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड शहरात कचराकुंडीची साफसफाई करताना कर्मचाऱ्यांच्या हातात ग्लोज, पायात गमबूट तसेच तोंडावर मास्क लावलेले दिसत नाही. महापालिकेकडून देण्यात येणारे हॅंडग्लोज निकृष्ट दर्जाचे असल्याने एक दिवस घातल्यानंतर फाटून जातात, असे अनेक कामगारांचे म्हणणे आहे. अनेकदा सफाई कामगार कचरा उचलताना हातात प्लास्टिकच्या पिशव्या वापरत आहेत. विविध आजारांचा शिरकाव होत असतानाच, पालिका कामगारांना विना सुरक्षा साफसफाई करावी लागत आहे.

महापालिकेचे आणि ठेकेदारांचे सफाई कामगारांची एकूण 4 हजार 813 कार्यरत आहेत. या कामगारांना किमान दोन वर्षातून एकदा पुरुष व महिलाना गणवेश, प्रतिमहा तोंडाचे मास्क, हॅण्ड ग्लोज, साबण, गमबुट, रेनकोट, स्वेटर देणे बंधनकारक आहे. परंतु, कर्मचाऱ्यांना ही साधन-सामुग्रीचा अद्याप उपलब्ध झालेली नाही. साफसफाई कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी वेळेवर होत नाही.

अनेक सफाई कामगार स्वताःचे आरोग्य धोक्‍यात घालून कचरा वेचून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. साफसफाई, वाहन चालक आणि कचरा वेचक कंत्राटी कामगारांची संख्या सुमारे 18 हजाराच्या आसपास आहे. तसेच कंत्राटी कामगारांना गणवेश, ओळखपत्र, हॅन्डग्लोज, मास्क, गमबूट अशी साधने सुविधा पुरविणे आवश्‍यक आहे. त्यांनाही काही सुविधा मिळत नाहीत.

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागातील आणि ठेकेदारांकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षा साधने द्यावेत, त्यांचे आरोग्य तपासणी घेण्यात यावी, त्यांच्यासह कुटूंबियांनाही उपचार मिळावेत, अशी मागणी विधी सभापती मोना कुलकर्णी यांनी आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे केली आहे.

सफाई कामगार असुरक्षीत
अनेक सफाई कामगारांना डोळ्यांची जळजळ, डोळे सुजणे, कंबरदुखी, हाडांचा त्रास, धुळीची ऍलर्जी, त्वचाविकार, स्नायूंवरील ताण, दमा व श्वसनाचे आजार अशा विविध आजारांचे सुमारे दोनशेहून अधिक कामगार त्रस्त आहेत, ज्यांना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. पालिका प्रशासनाकडून अशा कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याची आवश्‍यकता आहे. आतापर्यंत एकही आरोग्य तपासणी शिबिर महापालिकेने घेतलेले नाही, मग उपचार तर दूरच राहिले, असेही मोना कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)