‘मोगली’च्या जंगलाची अनोखी सफर…

मित्राचा लग्नासाठी भोपाळला जाणारच होतो तर ठरवलं चलो “हिंदुस्थान का दिल’ देख के आते है . मध्य प्रदेश टुरिझमची जाहिरात तशी आकर्षक आहेच. टुरिस्ट स्पॉटची यादी तयार झाली. भेडाघाट, धुवॉंधार खजुराहो,उज्जैन पण पाहिलं नाव होत ‘कान्हा ‘. आमच्या 4 जणांचा ग्रुपला आम्ही नावच दिला होता -‘टीम कान्हा’. ताडोबा मध्ये अपुरं राहिलेला ‘व्याघ्र दर्शन ‘ कान्हा मध्ये पूर्ण होईल हीच इच्छा होती. जबलपूरहून भेडाघाटचे संगमरवरी पहाड , निसर्गनिर्मित दगडी कलाकुसर ,धुवॉंधार ची जलक्रीडा डोळ्यात साठवून आम्ही कान्हाच्या प्रवासाला निघालो . अंधार वाढत होता … जंगलाची घनता वाढत होती … तशी जंगलाची ,अंधाराची भीती वाटत होती . अखेर रात्री 8.30 वाजता आम्ही रिसॉर्टला पोहचलो .

कान्हा अभयारण्यात जाण्यासाठी 4 गेट आहेत – कान्हा ,किसली ,सराई व मुक्की . आम्ही पहाटे 6 वाजता ‘कान्हा ‘ गेट वर पोहचलो . तेथे आम्हाला सफारी जीप व गाईड दिले गेले .सफारी सुरु होण्यापूर्वी आम्हाला गाईड ने काही विशेष सूचना दिल्या . दैनंदिन जीवनात सहसा नियम न पाळणारे आम्ही वन्यजीवांचा घरात तरी त्यांचे नियम पाळायचे ठरवले . जसे जंगलात जाऊ लागलो तसे झाडांची दाटी व उंची वाढत होती. दाट झाडींनंतर आम्ही एका विस्तीर्ण गवताळ कुरणावर पोहचलो . जमिनीलगत दाट धुके पसरले होते .धुक्‍याचा आड एक लांडग्याचे कुटुंब दिसले – नर मादी व 3 पिल्ले . तोंडातून एकच शब्द बाहेर ‘अकेला..! ‘. ‘जंगल बुक ‘ मध्ये मोगलाला सांभाळणारा ..अकेला… मोगली ची कथा काल्पनिक नसून येथेच घडलेली असावी याची आता खात्री वाटू लागली .

पुढे हरीण ,सांभर ,रानडुक्कर ,नीलगाय ,गवा आमचा भेटीस आले. कान्हा चे खास आकर्षण …Jewel of Kanha – बारासिंगा. हरिणापेक्षा आकाराने मोठे व डोक्‍यावर फांद्याप्रमाणे शिंगे. हि वन्यप्रजाती केवळ कान्हा मधेच दिसून येते. बारासिंगाची प्रजाती वाढविण्यासाठी कान्हा मध्ये विशेष संशोधन व प्रयत्न चालू आहेत . आमची नजर फक्त ‘वाघा ‘ ला शोधत होती . अचानक रस्त्याचा मधोमध हरिणाचा पाडसं येऊन थांबलं . त्याचा मागोमाग त्याची आई देखील होती . दाट झाडीतून सूर्यकिरणांची कवडसे त्याचा नाजूक अंगावर पडत होते. पिवळ्या ठशांचा कातडीवर कोवळी सूर्याची किरणे … पाडसाचं रूप सोन्यासारखं उजळून निघालं होतं. एखादी आई नवजात बाळाला कोवळ्या उन्हात घेऊन बसते .. हेच चित्र डोळ्यासमोर तरळलं …हे दृश्‍य डोळ्यांचे पारणं फेडणारं होता .

आता केवळ व्याघ्र दर्शनाची आतुरता होती अन गाईडला रस्त्याचा वाघाचा पावलांचे ठसे दिसले . पुढे जाताच काही वेळापूर्वी वाघ जेथे बसला होता त्याचे ठसे स्पष्ट दिसत होते. पंजा व शरीराचे ठसे पाहून कल्पना केली हे जनावर किती अवाढव्य असेल . गाईड ने वाघाचे नाव सांगितले ..”मुन्ना’. भारतीय जंगलातील सध्याचा सर्वात मोठा वाघ – मुन्ना. हा मुन्ना आमच्यासाठी “शेरखान’ होता. दाट झाडीतून त्याचा डरकाळ्या व घुरघुरण्याचा आवाज येत असे आणि आवाजाचा अंदाजाने गाडी थांबत होती. आमची नजर ‘शेरखान ‘ ला शोधात होती. सुमारे अर्ध्या तासाचा प्रतीक्षेनंतरही “शेरखान’ चे दर्शन काही झाले नाही .

जराशा निराशेनेच आम्ही परतीची वाट सुरु केली. बाहेर आल्यावर कोणाला वाघ दिसला याचीच चर्चा चालू होती. आज जरी ‘शेरखान ‘ची भेट झाली नाही तरी ‘कान्हा -मोगली ‘ शी एक अतूट बांध तयार झाला होता . प्रत्येकाने या “जंगलबुक’ सफारीचा अनुभव जरूर घेतला पाहिजे. “टीम कान्हा’नं व्याघ्र दर्शनाचे प्रयत्न अजून सोडलेले नाहीत …अजून काही साथीदारांसह आम्ही जाणार आहोत राजस्थानच्या “रणथंबोर’ सफारीला ..

– संकेत कोरडे 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)