सप्टेंबरमध्ये “सुपर हिट’

पाऊस मंदावला : तापमानात वाढ : परतीचा प्रवास लांबणार

पिंपरी – पावसाळा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्ण होतो. परतीच्या वाटेवर निघण्यापूर्वी चांगला पाऊस होत असतो. सप्टेंबरमध्ये मान्सून परतल्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये काही दिवस उकाडा आणि तीव्र उष्णता जाणवू लागते, याला ऑक्‍टोंबर हिट म्हणतात. परंतु यावर्षी सप्टेंबर महिन्यातच उकाडा आणि उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. काही दिवसांत पावसाने अचानकच ओढ दिली व तापमानातही वाढ झाली आहे. मान्सूनची परतीची वाटचाल मंदावली आहे. मध्यापासूनचा उकाडा सप्टेंबरच्या शेवटापर्यंत टिकला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मान्सून परतण्याची घोषणा करण्यास काही निकष आहेत. पश्‍चिमी राजस्थानातून मान्सून परतीची सुरुवात करतो. लागोपाठ चार ते पाच दिवस पाऊस न पडल्याने आर्द्रता कमी होण्यास सुरुवात होते. हवा दक्षिण आणि दक्षिण-पूर्वेपासून बदलून पश्‍चिम किंवा उत्तर-पश्‍चिम होते. तापमानात वाढ होते. अशा वेळी मान्सून परती घोषणा केली जाते. परंतु यंदाचे स्थिती बदलली आहे.

हवामान अभ्यासक स्कायमेट वेदरच्या गेल्या आठवड्यातील निरीक्षणानुसार सध्या मान्सून परतत असल्याची चिन्हे दिसत असली, तरी बंगालच्या खाडीमध्ये एक नवीन “मान्सून सिस्टीम’ विकसित होत आहे. तसेच आर्द्र हवा देखील येथे येत आहे. यामुळे मान्सून आता परतत असल्याचे दिसत नाही. काही दिवसांत मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होईल. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्‍मीर, पंजाब, दिल्ली राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे. परंतु महाराष्ट्रात मात्र पाऊस पूर्ण थांबला आहे. या वातावरणाचा हिवाळ्यावर परिणाम होईल व हिवाळ्याचे आगमन देखील लांबण्याची शक्‍यता स्कायमेटने वर्तवली होती. गेल्या वर्षी 27 सप्टेंबरपासून राजस्थानमधून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला होता आणि त्याची सांगता 15 ऑक्‍टोंबरला दिल्लीत झाली होती. यंदा हे चक्र पुढे ढकलले जाण्याची शक्‍यता आहे.

आणखी आठवडाभर उकाडा
पुढील संपूर्ण आठवडा ढगाळ वातावरणाचा असणार आहे, असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. 26 सप्टेंबरपर्यंत पारा तीसच्या पुढे व किमान 20 च्या खाली येणार नाही. 27 सप्टेंबरपासून कमाल आणि किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्‍यता आहे. पुढील संपूर्ण आठवडा उकाड्याचा राहण्याची शक्‍यता आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अंदाज काहीसा असाच आहे, कमाल तापमान 30 अंश सेल्सियस राहणार आहे; परंतु स्कायमेटच्या मते या आठवड्यात हलक्‍या व मध्यम सरी कोसळण्याची शक्‍यता आहे; परंतु पुढील आठवडा उकाडा राहणार आहे.

दिवसा उकाडा; रात्री थंडी
सध्या दुहेरी वातावरण अनुभवयास मिळत आहे. सकाळी दहानंतरच उकाडा जाणवू लागत आहे, तर संध्याकाळी बोचरी थंडी जाणवू लागते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे. यामुळे शहरात व्हायरल फ्लूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. शहरातील बहुतेक क्‍लिनिकमध्ये सकाळी आणि सायंकाळी गर्दी दिसत आहे. कणकण भरणे, सर्दी, खोकला, घसा दुखणे, हलका ताप, अंगदुखीचे रुग्ण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)