सद्यस्थितीत दरांनी केले बेजार

  • कच्चा माल महाग; ऑर्डर मात्र अल्प दराने
  • समस्यांचे चक्रव्यूह भाग- 2

पिंपरी – लघु आणि मध्यम उद्योजकांवर एकीकडून ओईएम अर्थात बड्या कंपन्यांकडून रेट रिडक्‍शनचा दबाव टाकला जात आहे, तर कच्चा माल प्रामुख्याने स्टीलचे दर आवाक्‍याबाहेर आहेत. यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांसमोर सतत नुकसान सहन करणे अथवा उद्योग थांबवणे याशिवाय पर्याय नाही. बड्या कंपन्या दर कमी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात. त्यापैकी बिडींग हे एक मुख्य शस्त्र गेल्या दीड दशकापासून वापरण्यात येत असल्याचे दिसते. बिडींगमधून कंपन्या लघु उद्योजकांत दर कमी करण्याची स्पर्धा लावून देतात. विशेष प्रकारच्या उत्पादनासाठी तयार केलेली यंत्रणा सर्व काही बिडींग नावाचा प्रकार एका झटक्‍यात मोडीत काढतो.

स्टीलचे दर नियंत्रणाबाहेर
उद्योग क्षेत्रात प्रामुख्याने स्टीलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. स्टीलचे दर गेल्या एक वर्षामध्ये नियंत्रणाबाहेर गेले आहेत. स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने स्टील आयातीवरील नियम कडक केले. चीनने प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी स्टीलचे उत्पादन थांबवले, त्यामुळे देशातील मोजक्‍या काही स्टील उत्पादक कंपन्यांनी स्वतःची मक्‍तेदारी निर्माण केली. खुल्या बाजारात स्टीलचे दर खूपच वाढले. त्या तुलनेत बड्या कंपन्या लघु उद्योजकांच्या दरात बदल करत नाहीत. काही बड्या कंपन्यांनी लघु उद्योजकांसाठी स्टील कंपन्यांसोबत दराविषयी धोरण निश्‍चित केले आणि त्यानुसार लघु उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाचे दर ठरवून दिले. परंतु स्टील कंपन्या या लघु उद्योजकांना बड्या कंपन्यांना ठरवून दिलेल्या दराप्रमाणे कच्चा माल न देता खुल्या बाजारात विकण्यास अधिक प्राधान्य देतात. बड्या कंपन्यांनी लघु उद्योजकांना 40 रुपये हा स्टीलचा दर ठरवून दिला असला तरी लघु उद्योजकांना तोच माल 52 ते 55 रुपयांनी खरेदी करावा लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मनुष्य बळाचा अभाव
सध्या उद्योग क्षेत्रात कुशल मनुष्य बळाचा अभाव आहे. रोजगार नाही, अशी देशभरात ओरड होत असताना उद्योगांना मात्र चांगले कामगार मिळत नाहीत. स्थानिक नागरीक उत्पादन क्षेत्रात काम करण्यास तयार होत नाहीत. बहुतेक तरुण वर्ग उच्च शिक्षित झाल्याने तो उच्च पदाच्या नोकरीच्या शोधात असतो. हेल्पर, फीटर, टर्नर होण्यास कुणीच तयार होत नाही. अशा वेळी उद्योग क्षेत्राची संपूर्ण भीस्त परप्रांतीय कामगारांवर असते. हे कामगार उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या गावी जातात. त्यामुळे उत्पादन खोळंबते आणि त्याचा आर्थिक फटका उद्योजकांना सहन करावा लागतो. सरकारने स्किल इंडिया हा उपक्रम सुरू केला असला तरी उद्योगांची कामगार ही गरज पूर्ण होत नाही.

बॅंकांनी हात आखडते घेतले
एकूणच प्रतिकुल स्थितीत उद्योग टिवण्यासाठी उद्योजकांनी अतिरिक्‍त आर्थिक सहाय्याची गरज आहे. परंतु बॅंकांना हजारो कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पळालेल्या ठगांमुळे बॅंकांनी हात आखडते घेण्यास सुरुवात केली आहे. लघु आणि मध्यम उद्योजकांना बॅंका आता पूर्वीप्रमाणे कॅश-क्रेडिट लिमिट आणि कर्ज देत नाहीत. बड्या कंपन्यांच्या अतिरिक्‍त नफ्याच्या हव्यासापोटी लघु उद्योजक तोट्यात जात आहे. त्यामुळे त्याची आर्थिक उलाढालही मंदावते. आर्थिक उलाढाल कमी झाल्याने बॅंका सीसी लिमिट कमी करत आहेत. यामुळे उद्योजकांच्या अडचणीत भर पडत आहे.

लघु उद्योजकांच्या माथी माथाडी
बड्या कंपन्यांना स्वतःकडे कोणतेही अतिरिक्‍त खर्च नको असल्याने ते सर्व लघु उद्योजकांच्या माथी मारतात. यातीलच एक मोठा भाग म्हणजे माथाडी कामगार. पूर्वी लघु उद्योजक आपला माल घेऊन बड्या कंपनीत जायचा आणि तो माल उतरुन घेण्याची जबाबदारी कंपनीची असायची. परंतु गेल्या काही वर्षात माथाडीची सर्वच क्षेत्रात दखल वाढली आणि माथाडीचा खर्चही कंपन्यांनी लघु उद्योजकांच्या माथी मारला. कित्येक कंपन्यांमध्ये माथाडी नेत्यांना पैसे दिल्याशिवाय माल कंपनीत नेता येत नाही. त्यात कंपन्यांनी इन्वेंटरी कंट्रोलच्या नावाखाली रोज लागेल एवढाच माल मागवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता माथाडींना वारं-वार पैसे देणे हे लघु उद्योजकांसाठी नवे संकट उभारले आहे.

कर्ज हवे आहे का?
जेव्हा आर्थिक समस्यांच्या दुष्टचक्रात लघु उद्योजक पूर्णपणे अडकला जातो तेव्हा तो या चक्रव्युहातून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागतो. सध्याची परिस्थिती पाहता त्याची फॅक्‍टरी, जमीन विकत घेण्यास कोणीही तयार होत नाही. अचानकच या उद्योजकांना फोन येऊ लागतात की, कर्ज हवे आहे का? कर्ज आणि सीसीसाठी धडपडणारा उद्योग हे ऐकून सुखावतो परंतु हे फोन बॅंकेतून येत नसून फायनान्स कंपन्यांतून येतात. ज्या बड्या कंपन्यांनी त्या लघु उद्योजकास या चक्रव्युहात अडकवलेले असते त्याच बड्या कंपन्यांनी काही फायनान्स कंपन्या सुरु केल्या आहेत. त्याच फायनान्स कंपन्या या उद्योजकांना महागड्या व्याज दराने कर्ज देण्यास तयार होतात. एकंदरीत बड्या कंपन्या आपल्या सप्लायरलाच कर्जबाजारी करुन गब्बर होत आहेत. अशा प्रकारे कित्येक उद्योजक या दुष्टचक्रात अडकले असून कित्येक उद्योग ठप्प होऊन ते पूर्णपणे कर्जात बुडाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)