सत्संगासाठी आलेल्या तीन अल्पवयीन मुलांना पळवले

टिळेकरवाडी येथे 51 मुलांचे आध्यात्मिक शिक्षण सुरू

लोणी काळभोर- टिळेकरवाडी (ता. हवेली ) येथील महानुभव सत्संगांमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या तीन अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात राजेंद्र दत्तात्रय खेडेकर (वय 41, रा. कोरेगाव मुळ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. राजेंद्र खेडेकर व त्यांचे मित्र हरिभाऊ कांचन, इंद्रभान लोणकर, संजय भोसले आणि शामराव सावंत यांनी लोणकर वस्ती, टिळेकरवाडी येथे महानुभाव सत्संगांचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम 22 मार्च ते 22 एप्रिल दरम्यान होत आहे. या सत्संगांमध्ये सहभागी होण्यासाठी जाधववाडी (ता. जुन्नर) येथील श्री देवदत्त आश्रम मधील 1500 साधुसंत आणि 51 मुले आली आहेत. संत श्री जयेश मुनी अंकुलनेरकर (वय 43) हे या 51 मुलांना आध्यात्मिक शिक्षण देऊन त्यांची देखरेख करतात. या कार्यक्रमासाठी 12 एकर जागेत टाकलेल्या मंडपात सर्वांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र 11 एप्रिलपासून 51 मुलांपैकी 3 मुले बेपत्ता आहेत.

पळवून नेण्यात आलेली तीनही मुले जाधववाडी (ता. जन्नर) येथील आश्रमातील असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे- केशव राजेंद्र पटेल (वय. 14, मूळ गाव बामखेडा, ता. शहादा, जि. नंदूरबार), शुभम बाळासाहेब बोरगे (वय 15, मूळ गाव खेपडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) आणि गोपीचंद नरेंद्रमुनी अंकुलनेरकर (वय 14 मुळ गाव तुडका, ता. तुमसर, जि. भंडारा). या तीन अल्पवयीन मुलांना पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.