सत्ताधारी नगरसेवकांनी नगराध्यक्षांसह प्रशासनास धरले धारेवर

पाथर्डी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ः जेसीबी, पथदिवे, पाणीपुरवठ्याचा विषय गाजला

पाथर्डी – सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी झालेला अवास्तव खर्च, पालिकेचा गायब जेसीबी, नादुरुस्त पथदिवे, शहराला होणारा अशुद्ध पाणीपुरवठा, पालिकेच्या गाळ्यांची परस्पर झालेली विक्री, आदी मुद्‌द्‌यांवरून सत्ताधारी नगरसेवकांनी नगराध्यक्षांसह प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. नगरसेविका दीपाली बंग यांनी मैलामिश्रित पाण्याच्या बाटल्या भेट देत सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी बहुतांश प्रश्‍नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करून सारवासारव केली, तर पालिका प्रशासनाकडून नेहमीचीच साचेबद्ध उत्तरे देऊन मूळप्रश्‍नांना बगल देण्याचा प्रयत्न पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाहावयास मिळाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पालिका सभागृहात नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, गटनेते नंदकुमार शेळके, महिला व बालकल्याण सभापती संगीता गटाणी, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती मंगल कोकाटे, आरोग्य व पाणीपुरवठा समितीच्या सभापती शारदा हंडाळ,नगरसेविका दीपाली बंग, सुनीता बुचकुल, सुनीता भापकर, सविता डोमकावळे, नगरसेवक प्रवीण राजगुरू, बंडू बोरुडे, अनिल बोरुडे, प्रसाद आव्हाड नामदेव लबडे, रमेश गोरे, महेश बोरुडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख व कर्मचारी हजर होते.

नगरपरिषदेच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवण्याचा विषय आल्यावर नगरसेविका बंग यांनी पालिकेच्या मालकीची वाहने किती, अशी विचारणा केली. तसेच पालिकेचा जेसीबी कुठे आहे? असा प्रश्‍न केला. नगरसेवक बंडू बोरुडे यांनी त्यांना पाठिंबा दिला. जेसीबी दुरुस्तीसाठी लावला आहे. खर्चाचे अंदाजपत्रक बनविल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले. शहरातील बारा सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीस लाखो रुपयांचा बोगस खर्च दाखवल्याचा मुद्दा नगरसेवक प्रवीण राजगुरू यांनी उपस्थित केला.त्यावर शहरातील 12 शौचालयांसाठी सुमारे 23 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून, आतापर्यंत 14 लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे.

दुरुस्तीचे काम अपूर्ण असल्याची माहिती पालिका अभियंता संजय गिरमे यांनी दिली. बंद पथदिव्यांचा व ओपन थिएटरच्या जागेचा पार्किंगसाठी वापर करावा, अशी मागणी गटाणी यांनी केली. पालिकेने विजेचे साहित्य उपलब्ध करून देऊन पथदिव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी गटनेते नंदकुमार शेळके यांनी केली. नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी एलईडी बसविण्याबरोबरच मेहर टेकडी परिसरातील पाईपलाईनचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी केली.

पालिकेच्या मालकीचे गाळे परस्पर विक्री करणाऱ्यावर व करून देणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करा व संबंधित गाळे पालिकडे वर्ग करा अशी मागणी बांधकाम सभापती मंगल कोकाटे यांनी केली. गाळ्यांच्या खरेदी-विक्रीच्या बेकायदेशीर नोंदी केल्या, याला जबाबदार कोण असा प्रश्‍न नगरसेवक बंडू बोरुडे, राजगुरू, बंग यांनी विचारला. बाजार वसुलीच्या ठेकेदाराने तीन लाख 89 हजार रुपयाचा ठेका असताना एक लाख 70 हजार रुपये भरले. त्यास वर्क ऑर्डर कशी दिली, असा प्रश्‍न उपस्थित करत नगराध्यक्ष गर्जे यांनी संबंधित विभागावर वसुलीची जवाबदारी टाकण्याचे व नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले.

विजयनगर ते मुंडेनगर येथील नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी सुमारे दोन लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. पालिकेतील पंधरा रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगर विकास मंत्री रणजीत पाटील, पालकमंत्री राम शिंदे आमदार मोनिका राजळे यांच्या अभिनंदनाचा ठराव नगराध्यक्ष डॉ. गर्जे यांनी मांडला व सर्व सदस्यांनी बाकी वाजून ठराव मंजूर केला.

दोषींवर कारवाई करा – राजगुरू

नगरसेवक प्रवीण राजगुरू म्हणाले, पालिकेतील कर्मचारी नगरसेवकांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. जनतेच्या प्रश्‍नांची विचारना केली तर शिवीगाळ केल्याचा आरोप करून काम बंद आंदोलन करून जनतेला वेठीस धरतात. असा प्रकार माझ्याशीही झाला. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करत नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. मुख्याधिकाऱ्यांनी यावर मैन धरले, तर नगराध्यक्ष गर्जे यांनी मध्यस्थीची भूमिका घेत दोघांनाही सबुरीचा सल्ला दिला. नगरसेवक असमाधानी दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)