सततच्या पावसात पिकांची घ्यावयाची काळजी (भाग-२)

* ऊसवाढ – ऊस लागवडीच्यावेळी जमिनीत पावसाचे पाणी साचून राहिले असल्यास चर खोदून पाणी बाहेर काढावे व ऊस लागवडीसाठी ऊसाच्या टिपऱ्या न वापरता ऊसाची रोपे लावावीत. जर ऊस पडलेला किंवा कललेला असेल तर दोन ओळीतील ऊस एकमेकांना बांधून आधार द्यावा. सरीतील पाणी ओसरताच ऊस पिकास 50 किलो युरिया व 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्‍टर या प्रमाणे बुस्टर डोस द्यावा. ऊसास ड्रीप असेल तर खते ड्रीपच्या सहाय्याने द्यावीत. वाफसा येताच ऊसाच्या बुडख्यास मातीची भर लावावी. मुख्य ऊसास जर आस (फुटवे) फुटल्यास ते काढून टाकावेत.
* कापूसवाढ – शेतात पाणी साचले असल्यास कापूस पिकाचे शेंडे पिवळे पडण्याची शक्‍यता आहे. शेतामध्ये जास्त झालेले पाणी चर खोदून काढून टाकावे म्हणजेच पाण्याचा निचरा करावा. वापसा आल्यानंतर पिकास युरिया 15 किलो + म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो प्रति हेक्‍टरी खतांची मात्रा द्यावी. सततच्या होणाऱ्या पावसामुळे व जास्त आर्द्रतेमुळे पांढरी माशी व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. उघडीप मिळल्यानंतर पांढरी माशीच्या नियंत्रणाकरीता ऍसिटॅमिप्रिड 20 एस पी 2 ते 3 ग्रॅम + स्टिकर 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी ऍसिफेट 10 ग्रॅम + स्टिकर 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
* वेलवर्गीय पिकेवाढ – किड तसेच केवडा व भुरी रोग नियंत्रणासाठी उघडीप मिळल्यानंतर क्‍लोरोपायरिफॉस किंवा प्रोफेनोफॉस 15 ते 20 मिली + पाण्यात विरघळणारे गंधक 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
* पशुधन व्यवस्थापन – सततच्या पावसामुळे रस्ते, चराऊ कुरणे, गोठे यांत चिखल, दलदल झाली असल्याने जनावरांच्या खुरांची विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. विशेषत: संकरीत गायी व पांढरी खुरे असणारे सर्व जनावरांची खुरे भिजून मऊ होतात. त्यात खडे, काटे टोचून जखमा होतात. खुरात चिखल रुतुन बसतो. अशावेळी खुरांचे निरीक्षण करुन उपचार करावा.
विशेषत: शेळ्या मेंढ्या यांच्यामध्ये खुरकुत दिसून येते. त्यासाठी वाढलेली व कुजलेली खुरे काढून टाकावी. खुरे झिंक सल्फेटच्या 10 टक्के द्रावणात 15 मिनीटे बुडवून ठेवा. मोरचुदाचे द्रावणही चालू शकते. पशुवैद्यकाच्या सहाय्याने औषधोपचार करा. हवेतील आर्द्रता वाढली असल्यो जनावरानां सर्दी, फुफुसाचा दाह यांचा त्रास होण्याची संभावना असते. शक्‍यतो गोठे कोरडे ठेवा. गोठ्यात वाढलेले गवत, रिकामी पोती यांची बिछायत टाका.
चुना भुरभुरा. गोठ्यातील वातावरण ऊबदार ठेवा. यासाठी गोठ्यात धुरी करा. जनावरांचा साठलेला चारा उदा. कडबा, मुरघास तसेच खाद्य विशेषत: शेंगदाणा पेंड, सरकी पेंड, गोळीपेंड यावर हिरवट काळसर बुरशी आली असेल तर असे खाद्य जनावरांना देऊ नका. चारा व खाद्य पावसात भिजणार नाही अशा ठिकाणी साठवा. शक्‍य नसेल तर पॉलिथीन पेपरचा वापर करा. जनावरांच्या आहारात वाळलेल्या चाऱ्याचे प्रमाण वाढवा म्हणजे शेणाची पोहरी व्यवस्थित बांधून राहील. माशा व डास यांचा प्रादुर्भाव टाळा.
अमोल विलास क्षीरसागर 
चंद्रशेखर महादू गुळवे 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)