सणसवाडीतील बोगस खरेदीखत; एका वकिलाला अटक

शिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथे जमिनीच्या मूळ मालकाच्या नावाचे बनावट ओळखपत्र बनवून मूळ मालकाच्या जागी बनावट व्यक्‍ती उभा करून त्याच्या नावावर असलेली जमिनीची विक्री करून बनावट खरेदीखत केल्याप्रकरणी दि. 3 मार्च रोजी पाच जणांवर गुन्हा दाखल करणात आला होता. यातील दोघांना यापूर्वीच अटक केली असून मुख्य आरोपी असलेल्या आणि पुणे शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालय तसेच मुंबई येथील उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असलेल्या ऍड. हर्षल गोसावी याला अटक करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. तर यातील एक आरोपी फरार असून दुसरा अज्ञात असल्याने या दोघांना बेड्या ठोकण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.
ऍड. हर्षल प्रताप गोसावी (रा. आमदाबाद ता. शिरूर, मूळ रा. बदलापूर पश्‍चिम अंबरनाथ, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. तर संगनमत करून जमीनीचे बनावट खरेदीखत करणारे श्रीधर रामकृष्ण हरगुडे व सागर रामकृष्ण हरगुडे (दोघे रा. सणसवाडी, ता. शिरूर) यांना यापूर्वीच अटक केली आहे. तर सुदाम गेनभाऊ दरेकर हा फरार आहे. तर निपिन चंद्रकात शेठ (रा. राजेंद्रनगर, पुणे) असे फिर्याद दिलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. तर याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निपिन यांचे वडील चंद्रकांत शंकर शेठ यांनी 1983 मध्ये सणसवाडी येथील एक हेक्‍टर 75 आर शेतजमीन विकत घेतलेली आहे. शेठ कुटुंब पुण्यामध्ये वास्तव्यास आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये निपिन शेठ यांनी नेट वरून ऑनलाईन सातबारा पाहिला त्यांना त्यांच्या सणसवाडी येथील जमिनीच्या सातबाऱ्यावर त्यांच्या वडिलांच्या नावासोबत श्रीधर हरगुडे व हर्षल गोसावी हे दोन नावे दिसून आली, त्यामुळे निपिन यांनी शिरूर येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे जाऊन त्यांच्या जमिनीबाबत चौकशी करून जमिनीचे दस्त तपासले असता त्यांना त्याच्या सणसवाडी येथील जमिनीची 27 सप्टेंबर 2017 रोजी विक्री केली असल्याचे आढळून आले. त्यावेळी निपिन यांनी जमिनीचे दस्तऐवज प्राप्त करून पाहिले असता त्यांचे वडील चंद्रकांत शंकर शेठ यांच्याऐवजी एक डोक्‍यात टोपी घातलेला अनोळखी व्यक्‍तीचे छायाचित्र त्यांच्या वडिलांच्या नावासमोर लावलेले आणि दोन बनावट साक्षीदार उभे करून जमिनीची विक्री केली असल्याचे दिसून आले व ही जमीन अनोळखी व बनावट व्यक्‍ती उभी करून सणसवाडी येथील स्वामी समर्थ सहकारी बॅंक व बॅंक इंडिया शाखा बदलापूर ठाणे येथील बॅंकेच्या दोन कोटी रुपयांच्या धनादेशावर खरेदी करणाऱ्या श्रीधर हरगुडे व हर्षल गोसावी या दोघांनी बनावट व्यक्‍तीला दिले असल्याचे दिसून आले. त्यांनतर त्यांनी सणसवाडी येथील बॅंकेत जाऊन चौकशी केली असता खरेदीखतावर नमूद केलेला एकही चेक बॅंकेत वटलेला नसल्याचे दिसून आले, त्यामुळे जमिनीचे खरेदीखत बनवून जमीन खरेदी केली असल्याचे निपिन शेठ यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, संगनमत करून जमीनीचे बनावट खरेदीखत करणारे श्रीधर हरगुडे, हर्षल प्रताप गोसावी, सागर रामकृष्ण हरगुडे, सुदाम गेनभाऊ दरेकर तसेच एक अनोळखी व्यक्‍तीविरुद्ध बनावट ओळखपत्र बनवून जमिनीचे खरेदीखत केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले होते. त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी श्रीधर हरगुडे व सागर हरगुडे यांना अटक केली होती तर इतर आरोपींचा शोध घेत असताना मुख्य आरोपी असलेला ऍड. हर्षल गोसावी हा उच्च न्यायालयात अटकपूर्व जमीन घेण्यासाठी धाव घेत होता. त्यांनतर त्याला शिक्रापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश वारुळे यांनी पुण्यातून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे हे करीत आहे.

  • बनावट व्यक्‍तीबाबत समजना
    बनावट व्यक्‍ती उभी जमिनीचे करून खरेदीखत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी श्रीधर हरगुडे व सागर हरगुडे या दोघा सख्या भावांना अटक केली, त्यावेळी त्यांच्याकडे अनोळखी व्यक्‍तीबाबत चौकशी केली असता त्यांनी हर्षल याला त्याबाबत माहिती आहे, असे सांगितले होते, तर हर्षलला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता हर्षल हा सागर हरगुडे याला याबाबत माहिती असल्याचे सांगत आहे, त्यामुळे शिक्रापूर पोलिसांना देखील बनावट व्यक्‍तीबाबत काही समजेना असे झाले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)