सच्चा कलावंत 

डॉ. न. म. जोशी 

मायकेल अँजेलो नावाचा एक हाडाचा कलावंत जगविख्यात चित्रकार म्हणून प्रसिद्ध झाला. तो शांतपणे आपल्या स्टुडिओत काम करीत असे. मात्र, त्याचा मत्सर करणारेही काही इतर कलावंत होते. त्यातील एका चित्रकाराला असं वाटलं. “मायकेलच्या चित्रासारखी चित्रं मीही काढू शकतो. काय त्या मायकेलचं एवढं कौतुक?’ असा विचार करून त्या चित्रकारानं एक चित्र काढलं आणि लोकांना बघण्यासाठी एका मोठ्या चौकात एक उंच जागी ते लावलं. ते एका स्त्रीचं चित्रं होतं. पण त्या चित्राकडं बघताना स्वतःच त्या चित्रकाराला असं वाटलं की, त्या चित्रात काहीतरी उणीव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोणती उणीव आहे, चित्रात कोणती भर घालायला हवी हे त्याच्या ध्यानात येत नव्हतं. त्याने खूप विचार केला.
या चित्रकारानं मायकेल अँजेलोला कधीही बघितलं नव्हतं किंवा त्यानं मायकेल अँजेलोचा फोटोही कधी बघितला नव्हता. ते चित्र बरेच दिवस त्या चौकात होतं. मायकेल अँजेलोनं ते चित्र बघितलं आणि तो त्या चित्रकाराचं घर शोधत गेला. चित्रकार घरीच होता. “चौकातील चित्र तुम्ही काढलं आहे का?’ मायकेलनं विचारलं.
“हो माझंच आहे ते चित्र. आवडलं का तुम्हाला?’ चित्रकारानं विचारलं.
“हो. आवडलं. पण त्या चित्रात छोटी उणीव आहे.’ मायकेल म्हणाले.
“कोणती उणीव? सांगा तरी मला माझ्याही लक्षात ती उणीव येत नाही.’
“तुमची रेखाचित्राची पेन्सिल देता?’
“हो देतो.’

ती पेन्सिल घेऊन दोघेही चौकात आले. चित्रकार उत्सुकतेनं बघत होता. मायकेलनं त्या चित्रातील स्त्रीच्या डोळ्यांतील बुबुळांत दोन ठिपके दिले, त्याबरोबर ते डोळे सुंदर दिसू लागले. चित्रही अधिक सुंदर दिसू लागलं. चित्रकार खूश झाला आणि म्हणाला, “आता मी हे चित्र त्या मायकेल अँजेलोला दाखवतो. त्यानं काढलेल्या चित्रापेक्षा मी सुंदर चित्रं काढतो, हे त्याला कळेल. मी तुमचा आभारी आहे. तुम्ही मला या चित्रातील उणीव दाखवून दिलीत. पण तुमचं नाव काय?’ चित्रकारानं विचारलं.
“मी मायकेल अँजेलो.’ अँजेलो शांतपणे म्हणाले. आणि चित्रकार वरमला. त्यानं मायकेलची क्षमा मागितली.

कथाबोध 
खरा कलावंत हा निर्वैर असतो, उदार असतो, त्याचं मन विशाल असते, कला त्याला अशा उंचीवर नेते की उणेदुणे, मत्सर, हेवादेवा, मोठेपणा या सर्व गोष्टी तो विसरून गेलेला असतो. कलासाधना ही एकप्रकारे अध्यात्मसाधना असते. आविष्काराचे ईश्‍वरीय रूप म्हणजे कला. तिथे विकार, मोह यांना जागा नसते. मायकेल अँजेलोचा मत्सर करणारा चित्रकार अजून खऱ्या कलावंताच्या पातळीवर पोहोचायचा होता. उलट मायकेल अँजेलो मात्र मानवयोनीत असूनही दैवी पातळीवर पोहोचलेला होता. म्हणूनच त्याने त्या चित्रकाराच्या चित्रातील उणीव केवळ न दाखवता चित्र पूर्ण केलं. अशी असते खरी कला आणि असा असतो सच्चा कलांवत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)