संस्कृत भाषेला जागतिक स्तरावर मान्यता- राज्यपाल

नागपूर: संस्कृत भाषेला जागतिक स्तरावर मान्यता मिळत असून जर्मन,अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमधील प्रमुख विद्यापीठामध्ये संस्कृत भाषेचे अध्ययन होत आहे. कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाने जगातील विद्यापीठांसोबत समन्वय साधून संस्कृत अध्ययनासोबत संशोधनाला प्रोत्साहन देत एक प्रमुख अध्ययन केंद्र विकसित करावे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.

रामटेक येथील कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय येथे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी गुरुकुलाचा शुभारंभ तसेच नवीन शैक्षणिक भवनाचे लोकार्पण राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले तसेच गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे अनावरण व शारदापीठाचे शिलान्यास अनावरण राज्यपालांच्या हस्ते झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी पेजावरमठाधिपती श्रीविश्वेशतीर्थ श्रीपाद, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी,  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी,आमदार गिरीश व्यास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी  जोशी,कुलगुरु श्रीनिवास वरखेडी, माजी कुलगुरु डॉ. पंकज चांदे, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

देशाला संपन्न अशी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. भारतीय जीवनपद्धती आणि ज्ञानपद्धती जगातील सर्वोत्तम मानली जाते. संस्कृत ही अनेक भाषांची जननी असून या भाषेच्या विविध साहित्यप्रकारात अनमोल ज्ञानठेवा असल्याचे सांगताना राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले की,  सुश्रुतसंहिता, चरकसंहिता या सारख्या आरोग्यविषयक तसेच भास्कराचार्यांच्या लीलावती या ग्रंथांमध्ये गणितविषयक मूलभूत विचार आपणास पहावयास मिळतात. भास्कराचार्यांनी खगोल गणितात केलेले कार्य महान असून त्यांच्या कार्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

जगात संस्कृत, भारतीय प्राच्यविद्या यांचा अभ्यास व या विषयातील विविध शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर मूलभूत संशोधन होत आहे. जर्मनी व अमेरिका हे देश यामध्ये अग्रेसर आहेत. योग आणि आयुर्वेदाबाबत जगभर केवळ औत्सुक्यच वाढते आहे, असे नव्हे तर या दोन्हीचा स्वीकार जगभर होताना दिसत आहे. संस्कृत भाषेच्या शिक्षणात विद्यापीठाने अधिक समन्वय साधून यामधील संशोधनास प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही राज्यपाल चे. विद्यासागर राव  यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)