संशयिताच्या अटकेसाठी नाभिक समाजाचा रूग्णालयात ठिय्या

कराड – करपेवाडी (ता. पाटण) येथील खून झालेल्या भाग्यश्री संतोष माने (वय 17) हिच्या मृतदेहाचे बुधवारी येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले. मात्र, भाग्यश्रीच्या खुन्यास जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेऊन नाभिक संघटनेने रूग्णालयातच ठिय्या मारला. अखेर पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी उपस्थितांशी चर्चा करून त्यांचे निवेदन स्विकारून ठोस कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर भाग्यश्रीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

भाग्यश्रीच्या खुन्यास अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नाभिक समाजाने घेतल्याने वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, कराड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. संशयितास लवकरच अटक करण्याची ग्वाही दिली. तरीही कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर दुपारी पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे आणि शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी रुग्णालयात येऊन संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी भाग्यश्री माने हिच्या खुन्यास लवकरात लवकर अटक करावी, त्याला फाशिची शिक्षा व्हावी तसेच माने कुटुंबियांना पोलीस प्रशासनामार्फत संरक्षण द्यावे, अशा मागण्यांचे निवेदन संघटनेच्यावतीने देण्यात आले. संशयिताचा पोलीस शोध घेत असून त्याला लवकरच अटक केली जाईल. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन नवनाथ ढवळे यांनी दिले. त्यानंतर नाभिक संघटनेने ठिय्या आंदोलन मागे घेतले आणि नातेवाईकांनी भाग्यश्रीचा मृतदेह ताब्यात घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)