संविधानाला राखी बांधून रक्षा बंधन साजरे

निगडी- ज्याप्रमाणे बहीण आपल्या भाऊरायाला राखी बांधते आणि भाऊ आयुष्यभर तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतो, त्याचप्रमाणे संविधानाने आजपर्यंत लोकशाही व न्याय व्यवस्था टिकवली आहे. संविधान खऱ्या अर्थाने लोकशाहीचे आणि देशातील नागरिकांच्या अधिकारांचे रक्षक आहे. ही बाब ध्यानात घेऊन मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेने संविधानालाच आपला रक्षणकर्ता मानून रक्षा बंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृती महाराष्ट्र युवती सेल अध्यक्षा शिवानी लालबिगे, संगीता जोगदंड, वसंत चकटे, मुरलीधर दळवी, ऍड. सचिन काळे, अरविंद मांगले, गजानन धाराशिवकर, ऋतुजा जोगदंड, तृप्ती विसपुते यांनी भाग घेतला. अध्यक्ष विकास कुचेकर यांनी सांगितले की, संविधानामुळे माणसाला माणूस म्हणून जगण्याची ओळख मिळाली. त्यांना जगण्याचा अधिकार दिला गेला, त्यामुळे आपल्या संविधानाला वंदन करून त्याकडे आपले खऱ्या अर्थाने रक्षक म्हणून बघण्याच्या दृष्टिकोन समोर ठेवून हा उपक्रम केला आहे. पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या व प्रत्येकाचे रक्षणासाठी वचनबद्ध व बंधुता शिकवणारे संविधानच बहीण-भावाच्या नात्याप्रमाणे आहे. तसेच याच संविधानानेच आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. तसेच सर्व धार्मियांना एकत्र बांधून ठेवण्याचे कामही संविधानाने केले आहे. समाज एकसंध ठेवण्याचे काम रक्षाबंधन सणाच्या माध्यमातून होत असते. प्रदेशाध्यक्ष सतीश लालबिगे म्हणाले की, राखी पौर्णिमेला संस्थेने या अनमोल ग्रंथाला राखी बांधून संविधान वाचन केले. महिलांनी सर्व पदाधिकाऱ्यांना औक्षण करून राखी बांधली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)