संवाद !!!

संपदा देशपांडे

”अगं! आई किती उशीर हा ! दुपारी तीन वाजता गेली होतीस भिशीला…आता वाजले बघ किती? आणि काय गं…तुम्ही दर महिन्याला भेटता…तरी सुद्धा तीन तीन तास काय करता?” घरात पाऊल टाकल्या टाकल्या…लेकीची तक्रार सुरु झाली. मी हसत हसतच म्हणाले, तुम्ही नेहमी फेसबुक, व्हॉटस्‌ ऍप, इन्स्टावर जे चाट करता ना, तेच आम्ही प्रत्यक्षात भेटून करतो. पण हा फरक तुमच्या या पिढीला कसा कळावा बरं? दर महिन्याला आम्हा मैत्रिणींची भिशी असते. ती किती रक्कमेची आहे, मेन्यू काय आहे? यापेक्षा एकत्र येऊन संवाद साधण्याचे ते एक निमित्त असते. खरंच, सगळ्या एकत्र जमलो ना, आम्ही वय विसरुन धमाल करतो. चेष्टा, विनोद यांना अगदी ऊत येतो. पण त्याबरोबरच एकमेकांच्या काही समस्या असतील तर चर्चा करुन त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो.एकमेकांचे नॉलेज शेअर करतो. त्यामुळे बऱ्याच नवीन गोष्टी शिकता येतात. चांगल्या-वाईट प्रसंगात मदत करतो. हे शक्‍य होतं, ते आमच्यात होत असलेल्या मनमोकळ्या संवादामुळेच!आम्ही बाहेर पडतो ते, पुढील महिन्याभराची ऊर्जा घेऊनच.

पूर्वीच्या काळी घरात तीन-तीन पिढ्या एकत्र नांदत असत. अर्थातच माणसे भरपूर असल्यामुळेएकमेकांच्यात सतत काही ना काही संवाद घडत असायचा. आता विभक्‍त्त कुटुंब पद्धती आणि त्यात आई-वडील दोघेही सतत कामात व्यस्त. त्यामुळे आजकाल माणसांमधला आणि नात्यांमधला प्रत्यक्ष संवाद कमी होऊ लागला आहे. हल्ली टीव्ही, मोबाईल प्रत्येकाच्या जवळचा बनत चालला आहे. परवाच एक विनोद वाचनात आला. नवरा-बायको जेवायला बसलेले असतात. काही वेळाने नवरा पाणी आणावयास स्वयंपाकघरात जातो. तर व्हॉटस्‌ऍपवर बायकोचा मेसेज येतो, येताना मीठ घेऊन या,नवरा रिप्लाय करतो, हो आणतो, पण मी तुला मगाशीच मेसेज केलाय, मला भाजी वाढ म्हणून..! यातील विनोदाचा भाग वेगळा, पण यावरुन आपण या माध्यमांच्या किती आधीन झालो आहोत, ही खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. व्यक्‍त्ती-व्यक्‍त्तीतले सहचर्य आणि सहजीवन, सहवेदना आणि सहवास आता संपत चालला आहे आणि हे घडतंय केवळ संवाद हरवल्यामुळे!

नवीन पिढीच्या जन्मापासून या गोष्टी आहेत. मग या गोष्टींचा प्रभाव राहणारच त्यांच्यावर. आपण यांना दोष तर कसा द्यायचा. शेवटी या माध्यमांचा वापर आपण करु तसा आहे. या सोशल मीडिया मुळेचहल्ली वर्षानुवर्षे न भेटलेले शाळकरी मित्र-मैत्रिणी एकत्र येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे परंतु, वाढदिवसादिवशी नुसत्या मेसेजवर न भागवता फोनवरुन संवाद साधला तर त्या व्यक्‍त्तीच्या आनंदात भर पडणार नाही का? घरातल्या वडील माणसांना आपल्या दिवसभरातली 10-15 मिनिटे त्यांची विचारपूस करण्यासाठी दिली तर त्यांना जगण्याची नवी उमेद मिळेल. संवाद हा मनुष्याच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे. अर्जुनाने श्रीकृष्णाशी संवाद साधला. त्याला श्रीकृष्णाने गीता सांगितली. अर्जुनाला मानसिक बळ मिळाले. आपली मुले, वडील माणसे, नातेवाईक,मित्र-मैत्रिणी, शेजारी यांच्याशी सदैव साधून संवादे, राहू आनंदे!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)