संरक्षणमंत्री सीतारामन यांना आप नेत्याकडून कायदेशीर नोटीस

राफेल करार रद्द करण्याची मागणी
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह यांनी राफेल करारातील कथित अनियमिततेबद्दल संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना कायदेशीर नोटीस बजावली. त्या नोटिसीत फ्रान्सबरोबरचा राफेल करार रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राफेल विमान करारावरून विरोधक सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत. अशातच फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलांद यांनी नुकताच एक गौप्यस्फोट करून विरोधकांच्या हाती एकप्रकारे नवा दारूगोळा दिला. यापार्श्‍वभूमीवर, सिंह यांनी पाठवलेल्या नोटिसीला महत्व आहे. राफेल लढाऊ विमाने बनवण्याची मनाई दसॉल्ट-रिलायन्स एअरोस्पेसला करण्यात यावी. कराराच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशा मागण्याही नोटिसीद्वारे करण्यात आल्या आहेत. सीतारामन यांनी तीन दिवसांत मागण्या पूर्ण केल्या नाहीत; तर न्यायालयात जाऊ, असा इशारा सिंह यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राफेल करारात 36 हजार कोटी रूपयांचा महाघोटाळा झाला आहे. इतर विरोधी खासदारांसमवेत मी राफेलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावेळी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी विसंगत उत्तरे दिली. ओलांद यांच्या खुलाशाने आमचे आरोप खरे ठरले आहेत.

तब्बल 78 वर्षांचा अनुभव असणाऱ्या एचएएल कंपनीला नाकारून केवळ बारा दिवस आधी स्थापन झालेल्या रिलायन्स कंपनीला कंत्राट का देण्यात आले, या प्रश्‍नाचे उत्तर सरकारकडून देण्यात आलेले नाही, असे सिंह येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. भारत सरकारने रिलायन्सच्या नावाचा प्रस्ताव दिल्याने फ्रान्सपुढे कुठला पर्याय उरला नाही, असा खुलासा ओलांद यांनी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)