संपामुळे रूग्णांची फॅमिली डॉक्‍टरांकडे गर्दी

“आयएमए’च्या 3 लाख ऍलोपॅथिक डॉक्‍टरांनी सेवा ठेवली बंद
पुणे – बदलत्या हवामानामुळे शहरात साथीचे आजार झपाट्याने पसरत आहे. सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, अंगदुखी ही लक्षणे आढळणाऱ्या रूग्णांमध्ये मोठी वाढ होत असून, त्यावर उपचार घेण्यासाठी रूग्ण आपल्या फॅमिली डॉक्‍टरांकडे गर्दी करत आहे, असे असताना या डॉक्‍टरांकडून शनिवारी (दि. 28) “एनएमसी’ विधेयकाला विरोध करण्यासाठी एकदिवसीय संप पुकारला. मात्र, या संपाचा फटका गरीब व सर्वसामान्य रूग्णांना बसला असून, त्यांना उपचार मिळण्यास अडचणी आल्या.

सध्या वैद्यकीय क्षेत्रात संपाचे “पुराण’ वारंवार होत आहे. मात्र, डॉक्‍टर, परिचारिका यांनी पुकारलेल्या संपामध्ये प्रत्येकवेळी रूग्ण भरडला जात आहे. या संपाने काही रूग्णांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केले आहे. काही दिवसांपूर्वीच ससून रूग्णालयात वार्डच्या डॉक्‍टरांनी संप पुकारला, त्यानंतर परिचारिकांनी संप पुकारला त्यामुळे ससून रूग्णालयातील रूग्ण व्यवस्था मोडकळीस आली होती. शासकीय रूग्णालयांमध्ये ही परिस्थिती असताना, खाजगी वैद्यकीय क्षेत्रातही डॉक्‍टरांकडून संपाचे हत्यार वारंवार वापरले जात आहे. त्याचा फटका गरीब आणि सर्वसामान्य रूग्णांना बसत आहे. शहरात पहिल्यापासून फॅमिली डॉक्‍टर ही संकल्पना रूजलेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्दी, ताप, खोकला झाल्यावर रूग्ण मोठ्या रूग्णालयात न जाता ओळखीच्या किंवा घराजवळील छोट्या दवाखान्यात जाऊन डॉक्‍टरांकडून उपचार घेतो. त्यामुळेच फॅमिली डॉक्‍टर ही संकल्पना आजही टिकून आहे. परंतु या डॉक्‍टर वारंवार संप करत असल्यामुळे या संप काळात रूग्णांची हेळसांड होत आहे. शनिवारी पुकारलेल्या एकदिवसीय संपाचा फटका गरीब रूग्णांना बसला असून, त्यांना वेळेत उपचार मिळण्यास अडचणी आल्या. मोठ्या रूग्णालयात उपचार घेण्यासाठी खिशात पैसे नसतानाही उसणे पैसे घेऊन उपचार घेणे भाग पडले. त्यामुळे डॉक्‍टरांच्या संपाबाबत नागरिकांकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहे.

देशातील ऍलोपॅथिक डॉक्‍टरांचे नियमन करणाऱ्या “मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया’ (एमएमसी) या घटनात्मक परिषदेला बरखास्त करून केंद्र सरकार एनएमसी हे विधेयक लोकसभेत मंजुरीसाठी ठेवणार आहे. मात्र, या नवीन विधेयकात डॉक्‍टरांसह सर्वसामान्यांच्या विरोधी तरतूदी आहेत. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी “आयएमए’च्या 3 लाख ऍलोपॅथिक डॉक्‍टरांनी 12 तासांसाठी वैद्यकीय सेवा बंद ठेवल्या. यामध्ये पुण्यातील डॉक्‍टरांचा समावेश होता, अशी माहिती आयएमए चे अध्यक्ष डॉ. पद्‌मा अय्यर यांनी दिली.

यावेळी सचिव डॉ. राजकुमार शहा, डॉ. मिनाक्षी देशपांडे, खजिनदार डॉ. बी. एल. देशमुख, माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ.जयंत नवरंगे उपस्थित होते. प्रस्तावित एनएमसी विधेयकात ब्रिज कोर्सचा समावेश केला आहे. त्यामुळे क्रॉसपॅथी वाढेल. तसेच राज्य शासनाचे प्रत्येक खासगी वैद्यकिय महाविद्यालयांतील 85 टक्‍के जागांवर नियंत्रण आहे. या विधेयकाद्वारे ते 40 टक्‍क्‍यांवर आणण्यात येणार आहे. त्यामुळे उरलेल्या 60 टक्‍के जागा लाखो रूपये देऊन गुणवत्ता नसलेल्या उमेदवारांना वाटण्यात येतील. यामुळे गरीब व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डावलले जाईल, असे आयएमएने पत्रकार परिषदेत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)