संधी मिळाल्यास नेतृत्वासाठी सज्ज- रोहित

नव्या खेळाडूंचा आत्मविश्‍वास उंचावणे आवश्‍यक
दुबई – नियमित कर्णधार विराट कोहलीला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय धाडसी होता. परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सातव्यांदा आशिया चषक जिंकून हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. भारतीय संघाने रोहितच्या नेतृत्वाखाली दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या असून संधी मिळाल्यास आपण “टीम इंडिया’चे नेतृत्व करण्यासाठी सज्ज असल्याचा विश्‍वास रोहितने व्यक्‍त केला.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अत्यंत रोमांचकारी अंतिम लढतीत बांगला देशचा अखेरच्या चेंडूवर पराभव करून भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्याआधी भारतीय संघाने श्रीलंकेत झालेल्या तिरंगी टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद संपादन केले होते. तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत तीन वेळा अजिंक्‍यपद पटकावले आहे. आशिया चषक विजेतेपद जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितला कर्णधारपदाबद्दल प्रश्‍न विचारले जाणे स्वाभाविकच होते. परंतु रोहित त्यासाठी तयार असल्याचेच दिसून आले.

 

आम्ही एक प्रतिष्ठेची स्पर्धा नुकतीच जिंकली आहेै आणि त्यामुळेच या पार्श्‍वभूमीवर मीसुद्धा भारतीय संघाचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार आहे असे म्हणता येईल. किंबहुना जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा तेव्हा मी संघाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी मानसिकदृष्ट्या सज्ज आहे, असे सांगून रोहित म्हणाला की, तुम्ही नियमित कर्णधार असणे ही वेगळी जबाबदारी असते. परंतु हंगामी कर्णधार म्हणून एखाद्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी तुमच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपविली जाते, तेव्हा तुमच्यासमोरची आव्हानेही वेगळ्या स्वरूपाची असतात.

 

माझ्यापुरते सांगायचे झाल्यास अशा वेळी संघाचे नेतृत्व करताना माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्या संघातील स्थानाची काळजी न करता मुक्‍तपणे आपला सर्वोत्तम आणि नैसर्गिक खेळ करावा अशी माझी अपेक्षा असते, असे सांगून रोहित म्हणाला की, काही ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊन दुसऱ्या फळीतील खेळाडूंना एखाद्या विशिष्ट स्पर्धेपुरती संधी दिली जाते, तेव्हा त्या स्पर्धेनंतर अव्वल खेळाडू पुनरागमन करणार आहेत हे निश्‍चित असते. त्यामुळे दुसऱ्या फळीतील खेळाडूंनी त्या स्पर्धेत कितीही चांगली कामगिरी केली असली, तरी त्यांना तात्पुरते का होईना बाजूला व्हावे लागणार हेही स्पष्ट असते.
ही सारीच परिस्थिती थोडी विचित्र असते. परंतु खेळाडूंशी संवाद साधून तुम्ही त्यांना समजावून सांगितल्यास त्यांना हे समजणे अवघड नसते. अखेर तुम्हाला संधी मिळताच तुम्ही तिचा कसा उपयोग करून घेता हे महत्त्वाचे असते. तुमच्या चांगल्या कामगिरीची नोंद घेतलीच जाते आणि आज किंवा उद्या तुमच्या नावाचा विचार होणार असतो. त्यामुळे तुम्ही मोकळेपणाने बाकी कशाचाही विचार न करता संघासाठी सर्वस्व पणाला लावून योगदान द्यावे, इतकीच माझी अपेक्षा असते, असेही रोहितने सांगितले.

खेळाडूंना मदत करणे हेच कर्णधाराचे काम 
संघातील खेळाडूंना ज्या बाबतीत गरज भासेल, तेथे त्यांना मदत करणे हेच कर्णधाराचे खरे काम असते, असे सांगून रोहित म्हणाला की, संघातील खेळाडूंची क्षमता नीट ध्यानात घेऊनच कर्णधाराने त्यांच्याकडून अपेक्षा केली पाहिजे. तसेच कर्णधार म्हणून माझ्यावर आणि आमच्या प्रशिक्षकांवरही आणखी एक मोठी जबाबदीार असते, ती म्हणजे संघातील खेळाडूंना कोणत्याही दडपणाशिवाय मैदानावर आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणे शक्‍य झाले पाहिजे. खेळाडूंच्या मनात कोणत्याही प्रकारची असुरक्षितता असली, तर ते मैदानात सर्वस्व पणाला लावून कामगिरी करणार नाहीत. एक-दोन सामन्यांनंतर आपल्याला वगळले जाऊ शकते, असे वाटल्यास कोणताही खेळाडू पूर्ण क्षमतेने खेळू शकणार नाही. म्हणूनच अंबाती रायुडू किंवा दिनेश कार्तिक या खेळाडूंना आशिया चषक स्पर्धेतील सर्व सामन्यांत खेळविण्याची ग्वाही मी अगोदरच दिली होती. भारतीय संघातील खेळाडू तुलनेने अननुभवी होते, त्यांना अत्यंत उष्ण हवामानात खेळण्याचा सराव नव्हता. इंग्लंडमधील हवामानातून थेट दुबईतील हवामानाशी जुळवून घेणे सोपे नव्हते. परंतु आमच्या खेळाडूंनी हे सारे जमवून आणले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)