संधीचे सोने करणारा वास्तुविशारद

प्रसिद्ध वास्तुविशारद बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी यांना यावर्षीचे प्रित्झकर आर्किटेक्‍चरल प्राइज जाहीर झाले आहे. एका भारतीय वास्तुविशारदाला हा सन्मान प्रथमच लाभत असून, त्यांनी त्यांचे गुरू ली कार्बूजियर यांच्याकडून घेतलेल्या ज्ञानाच्या आधारावर अनेक सुंदर वास्तूंचे डिझाइन केले आहे. चंडीगड शहराचे डिझाइन ली कार्बूजियर यांचेच. आयुष्यात प्रत्येक संधीचे सोने करणे हा त्यांचा ध्यास असल्यामुळे तसेच नावीन्याचा शोध घेण्याच्या गुरुमंत्रामुळे त्यांच्या हातून अनेक उत्कृष्ट इमारतींची डिझाइन उतरली.

प्रित्झकर आर्किटेक्‍चर प्राइज – 2018 हा वास्तुकलेतील सर्वोच्च सन्मान भारतीय वास्तुविशारद बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी यांना प्राप्त झाला आहे. या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार असा या पुरस्काराचा लौकिक असून, 90 वर्षीय दोशी यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणे भारताच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. या पुरस्कारापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली असणार, हे उघड आहे. आपले आयुष्य ही संधींची साखळी आहे, अशी त्यांची धारणा आहे. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीवर नजर टाकली असता असे दिसून येते की, हे वाक्‍य केवळ तत्त्वज्ञान म्हणून त्यांनी जोपासलेले नसून ते प्रत्यक्षात उतरविले आहे. जीवनात आलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने करून दाखविले आहे.

अहमदाबाद येथे दोशी यांचे कार्यालय आहे. या इमारतीला आर्किटेक्‍चरल डिझाइन मॅगझीनने 125 वर्षांतील सर्वांत प्रयोगशील इमारतींच्या यादीत स्थान दिले आहे. आपले गुरू महान आर्किटेक्‍ट ली कार्बूजियर यांना ही वास्तू समर्पित असल्याचे दोशी सांगतात. ली यांचा हात आपल्या डोक्‍यावर अजूनही आहे, असा भास आपल्याला होतो, असे दोशी नेहमी सांगतात. दोशी सांगतात, “प्रत्येक इमारतीचे डिझाइन बनविताना त्यात काही ना काही नावीन्य शोधण्याचा मी प्रयत्न करावा, असे ली यांना वाटत असे. एकाच डिझाइनची पुनरावृत्ती केलेली माझ्या गुरूंना आवडत नसे.” जगातील प्रतिष्ठित वास्तुविशारदांच्या यादीत समाविष्ट असलेल्या दोशी यांनी अनेक जगप्रसिद्ध इमारतींचे डिझाइन तयार केले आहे.

सत्तर वर्षांच्या त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्टच्या इमारतीपासून नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजी या संस्थेच्या इमारतीपर्यंत अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या इमारतींचे आराखडे बनविले. त्यांनी डिझाइन केलेल्या शानदार इमारतींची भलीमोठी यादी देता येईल.

लहानपणी आपण आर्किटेक्‍ट व्हावे, असे दोशी यांना वाटत नव्हते. ते सांगतात की, पेन्टिंगची त्यांना खूप आवड होती आणि नंतर त्यांना विज्ञानात रुची निर्माण झाली. पेन्टिंगचा विद्यार्थी असताना विज्ञान विषयाची निवड का केली, असे शिक्षकांनी त्यांना विचारले. वस्तुतः त्यांच्या आजोबांचे फर्निचरचे दुकान होते आणि त्यांनी दोशी यांना जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर येथे प्रवेश घेण्याचा सल्ला दिला होता. अशा प्रकारे ते आर्किटेक्‍ट बनले. त्यांच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या एका मित्राच्या आमंत्रणावरून ते लंडनला गेले. त्याकाळी, 1950 मध्ये तेथे “इंटरनॅशनल कॉंग्रेस ऑफ मॉडर्न आर्किटेक्‍चर’चे आयोजन करण्यात आले होते.

दोशी यांच्या मनात काय कल्पना आली कोण जाणे; पण त्यांनी ऑब्झर्व्हर म्हणून या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अर्ज दाखल केला. कोलंबिया येथील आर्किटेक्‍ट सॅम्पर यांच्याशी त्यांची तेथे ओळख झाली. दोशी भारतीय आहेत, हे समजल्यावर सॅम्पर यांनी त्यांना “चंडीगड’ या शब्दाचा अर्थ विचारला. “चंडीचे घर’ असा या शब्दाचा अर्थ असल्याचे दोशी यांनी सॅम्पर यांना सांगितले.

त्यावेळी सॅम्पर यांनी सांगितले की, ते स्वतः ली कार्बूजियर यांच्यासोबत काम करीत होते. ली त्यावेळी चंडीगड शहराचा आराखडा तयार करीत होते. त्याच दरम्यान दोशी यांनी ली यांना प्रथम पाहिले. दोशी यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीवर नजर टाकल्यावर त्यांनी दोशी यांना स्वहस्ताक्षरात अर्ज करायला सांगितले. कारण, ली कार्बूजियर हे कोणत्याही उमेदवाराची निवड त्याचा स्वहस्ताक्षरातील अर्ज पाहूनच करीत असत. अर्ज केल्यानंतर एका आठवड्यातच त्यांना पॅरिस येथे शिकाऊ आर्किटेक्‍ट म्हणून काम करण्यासाठी निवड झाल्याचे पत्र मिळाले. त्यांना तेथे कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळणार नव्हता. अर्थात, ली कार्बूजियर यांच्यासमवेत काम करणे हा खूपच महत्त्वाचा अनुभव ठरणार आहे, असे दोशी यांना अनेकांनी सांगितले आणि मोबदला मिळणार नसूनसुद्धा त्यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केला.

फ्रान्सिसी भाषेचे दोशी यांना अत्यल्प ज्ञान होते. शिवाय, सोबत फारसे काही नव्हते. अशा अवस्थेतच ते ली कार्बूजियर यांच्या कार्यालयात पोहोचले. ली कार्बूजियर यांच्यासोबत काम करणे अत्यंत कठीण असते, असे त्याकाळी मानण्यात येत असे. ली यांना आव्हाने स्वीकारायला अवडत असत; परंतु त्यांचे व्यक्तिगत जीवन एखाद्या फकिरासारखे होते. त्यांना एकान्त आवडत असे आणि ते पेन्टिंग, लेखन किंवा विचार करण्यात सर्वाधिक वेळ व्यतीत करीत असत. चंडीगड उच्च न्यायालयाच्या इमारतींचे काही भाग डिझाइन करण्याचे काम दोशी यांना त्यांनी सर्वप्रथम दिले. तत्पूर्वी दोशी यांनी अशा प्रकारचे काम कधीच केले नव्हते.

काम करताना त्यांचे हात कंप पावत होते. ली त्यांच्याकडे शांतपणे पाहत राहिले आणि दहा दिवसांनंतर ली यांनी दोशी यांच्या शेजारीच बसून उच्च न्यायालयाच्या इमारतीचे डिझाइन बनविले. मोडक्‍यातोडक्‍या इंग्रजीत त्यांनी दोशी यांना सांगितले की, भारतात पक्षी भरपूर आहेत आणि घरांच्या मधून पक्षी उडत असतील, असे त्यांना वाटते. हवा आणि मोकळ्या जागांच्या महत्त्वासंबंधी ते दोशी यांच्याशी कायम बोलत असत. त्यांच्या कार्यालयात भारताचा हवामानशास्त्रीय नकाशा होता. त्यात उन्हाळा, हिवाळा, पावसाळा यासह तापमान, वाऱ्याची दिशा यासंबंधी माहिती होती. यावरूनच दिसून येत होते की, ली कार्बूजियर हे स्थानिक हवामान आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊनच डिझाइन बनवीत असत. त्यांच्या या अभ्यासपूर्ण कामाचा दोशी यांच्यावर सखोल परिणाम झाला.

दोशी यांनाही भारतीय परंपरांचा खूप अभिमान आहे. आपल्या सांस्कृतिक वारशावर त्यांचे प्रेम आहे. साराभाई हाऊस या ली कार्बूजियर यांनी डिझाइन केलेल्या इमारतीपासून प्रेरणा घेऊनच त्यांनी कमला हाउस हे आपले घर डिझाइन केले आहे. तीन वर्षांपूर्वी एका जपानी आर्किटेक्‍चरल नियतकालिकाने या घराचा उल्लेख विसाव्या शतकातील सर्वोत्तम घरांपैकी एक असा केला होता. चित्रकार एम. एफ. हुसैन यांच्या “एम्दाबाद नी गुफा’ या कलादालनाचे डिझाइनही दोशी यांनीच केले आहे. एका गुहेच्या स्वरूपातील ही वास्तू अनेक कलासक्त मंडळींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. अशा गुणी आर्किटेक्‍चरला या क्षेत्रातील नोबेल मानले जाणारे प्रित्झकर पारितोषिक मिळणे भारताच्या दृष्टीने भूषणावह आहे.

विनिता शाह


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)