संदीप पाटील यांना एक वर्ष मुदतवाढ द्या

सातारकरांची मागणी : मुख्यालयासमोर धरणे

सातारा, दि. 29 – एसपी संदीप पाटील यांनी सातारा जिल्ह्यात केलेल्या कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून शासनाने त्यांची बदली तातडीने रद्द करून एक वर्ष मुदतवाढ द्यावी , या मागणीसाठी सातारकर नागरिकांनी रविवारी पोलीस मुख्यालयासमोर धरणे धरले. दरम्यान, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर व पद्माकर घनवट यांनी निवेदन स्वीकारत भावना शासनाला कळविण्याचे आश्वासन दिल्यानंतर धरणे मागे घेण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील उच्चस्तरीय पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश शुक्रवारी रात्री जारी करण्यात आला. या बदल्याअंतर्गत सातारचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीण येथे बदली करण्यात आलीे. मात्र, पाटील यांनी सातारा जिल्ह्यात चांगले काम करुनही बदली केल्याच्या निषेधार्थ तसेच बदली रद्द करावी या मागणीसाठी रविवारी धरणे धरण्यात आले. यावेळी सुशांत मोरे, रविंद्र कांबळे, विलास माने, मधुकर शेंबडे, माजी नगरसेवक शंकर माळवदे, विजय बडेकर, नासिर शेख, राम हादगे, राजू गोडसे, अविनाश कदम, सागर भोगावकर, अंजली देशपांडे, विकास माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे,शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एसपी संदीप पाटील यांनी जून 2016 मध्ये सातारा जिल्ह्याचा कार्यभार घेतला. त्याअगोदर ते संवेदनशील असणाऱ्यागडचिरोलीचे पोलिस अधीक्षक होते. गडचिरोलीतून साताऱ्यात हजर होत असताना त्यांनी बुके नको बुक आणा असे सातारकरांना आवाहन केले आणि जिल्हावासियांनीही त्यांची एक पुस्तक देऊन भेट घेतली. जमा झालेली ही सर्व पुस्तके त्यांनी गडचिरोली येथील नागरिकांना वाचण्यासाठी पाठवून एक नवा पायंडा घातला. अशा पद्धतीने त्यांनी ‘पुस्तकप्रेमी’ म्हणून आगमन केले आणि दोन वर्षाच्या कालावधीत सातारा शहरासह जिल्ह्यातील सावकारी, खंडणीखोर,गुंडगिरी, पर्यटनस्थळी लुटणारी टोळी या गुन्हेगारीचा अक्षरशः बिमोड केला. जवळपास 100 हून अधिक जणांना मोक्का लावला. एसपी संदीप पाटील यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे नामचीन गुंडापासून गल्लीबोळातील हुल्लडबाजापर्यंत भले भले दबकून होते. थोडी जर गडबड झाली की मोक्का लागणार किंवा तडीपार होणार अशीपोलिसांची गुन्हेगारांवर दहशत निर्माण झाली होती. त्यांच्या याकार्यपद्धतीमुळेच सातारा जिल्ह्यातील क्राईमरेट कमी झाला. एसपी संदीप पाटील यांच्या या ठोस कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. केवळ गुन्हेगारांचाच नाही तर पोलीस दलातील कामचुकार, बेशिस्त वागणा-या आणि गुन्हेगारांचे खबरी म्हणून काम करणा-या कर्मचा-यांवरही त्यांनी कारवाईचा बडगा उचलला होता. त्यामुळे पोलीस दलामध्ये त्यांच्याबद्दल आदरयुक्त दरारा निर्माण झाला होता. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीमध्ये जखमी होऊनही ते कार्यरत राहिले आणि दंगल पसरणार नाही याचीही त्यांनी काळजी घेतली होती. त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होऊ दिला नाही. जिल्हयातील गुन्हेगारी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी त्यांची बदली रद्द करुन त्यांना आणखी एक वर्षे मुदतवाढ देण्यात यावी. त्यांच्या बदलीला समाजातील सर्वच क्षेत्रातील घटकांचा विरोध असून त्यांना मुदतवाढ मिळावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. तरी लोकभावनेचा विचार करुन आपण त्यांची बदली तातडीने रद्द करण्याचे आदेश काढावेत अशी मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)