संतपीठावरून भाजप-राष्ट्रवादीत “सेटलमेंट’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महासभेत चिखलीतील संतपीठ, भोसरीतील रुग्णालयाचे खासगीकरण याविषयावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा गदारोळ सुरू असतानाच त्याचा फायदा घेत महापौर राहुल जाधव यांनी विषयपत्रिकेवरील या दोन महत्त्वाच्या विषयांसह एकूण 13 विषय मंजूर केल्याचे जाहीर केले. या गदारोळात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तीन माईकची तोडफोड करत महापौरांसमोरील कागदपत्रे भिरकावत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. शिक्षक वर्गीकरणाच्या विषयावरून विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यावर भाजपशी “सेटलमेंट’चा आरोप शिवसेनेने केला होता. आता संतपीठाच्या विषयावरून देखील सानेंवर शिवसेनेने “सेटलमेंट’चा आरोप केला. तसेच सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत छुपी युती असल्याच्या आरोपाचा शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत पुनरूच्चार केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जानेवारी महिन्याची तहकूब सभा सोमवारी (दि. 4) झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. विषयपत्रिकेवर चिखलीत उभारण्यात येणाऱ्या जगत्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ आणि कंपनीच्या संचालक मंडळाला मान्यता, महापालिकेचे भोसरीतील रुग्णालय खासगी संस्थेला 30 वर्षे कराराने चालवायला देणे, महापालिकेच्या 40 टक्के हिश्‍याप्रमाणे पीएमपीएमएला 160 बस खरेदी करण्याकरिता प्रति बस 48 लाख 40 हजार यानुसार 160 बसेससाठी 77 कोटी 44 लाख 72 हजार 800 रुपये पीएमपीला टप्प्या-टप्प्याने गरज आणि मागणीनुसार वर्ग करणे असे महत्त्वाचे विषय होते.

सभा कामकाज सुरु होण्याच्या अगोदर विरोधी पक्षनेत्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचे फलक हातामध्ये घेऊन महापौरांच्या आसनासमोरील हौदात आंदोलन केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते दत्ता साने संतपीठावरील चर्चेला सुरुवात केली. विकास कामातील होणाऱ्या “रिंग’ बाबत बोलत असतानाच माजी महापौर नितीन काळजे यांनी आक्षेप घेत, त्यांना मध्येच रोखले. साने यांनी संत पीठावर बोलावे, अशी काळजे यांनी मागणी केली. त्यानंतर साने आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर आसनासमोर धाव घेतली. महापौरांसोबत वादावादी सुरू असतानाच महापौर जाधव यांनी अचानक संतपीठाच्या विषयासह दोन विषय मंजूर केले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापौरांनी सभा कामकाज एक तासासाठी तहकूब केले.

संतपीठाचा विषय गदारोळात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी भोसरीतील रुग्णालयाच्या खासगीकरणावर चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु, पुन्हा सभा कामकाज सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी “ठरल्याप्रमाणे’ महापौर आसनासमोर गोंधळ घातला. याच गोंधळाचा “ठरल्या’प्रमाणे फायदा घेत सत्ताधाऱ्यांनी सभा कामकाज पूर्ण केले. वास्तविक, राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांची चर्चा करावी, अशी मागणी होती. संसदीय आयुधांचा वापर करुन सत्ताधाऱ्यांना जेरीस आणावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु, तसे झाले नाही. राष्ट्रवादीत देखील दोन गट पडले आहेत. काही नगरसेवकांनी निषेधाचे फलक घातले नव्हते तर, आंदोलन सुरु असताना महिला नगरसेविका जाग्यावर उभ्या राहिल्या होत्या. तर, अनेक अभ्यासू नगरसेवकांनी महासभेलाच दांडी मारली. त्यामुळे यातून राष्ट्रवादीतील गटबाजी देखील चव्हाट्यावर आली आहे.

सत्ताधाऱ्यांना जेरीस आणून विषय मागे घ्यायला भाग पाडायला पाहिजे होते, असे सत्ताधारी भाजपच्याच काही नगरसेवकांनी पत्रकारांशी खासगीत बोलून दाखविले. विरोधी पक्षातील काही नगरसेवक आणि सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवक मिळून “तु मारल्यासारखे कर आणि आम्ही रडल्यासारखे करतो’ याप्रमाणे कामकाज करत असल्याची जोरदार चर्चा पालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सानेंच्या भूमिकेवरून विरोधकांमध्ये फूट
संतपीठ, भोसरीतील रुग्णालयाचे खासगीकरण हे विषय महत्त्वाचे होते. याविषयावर साधक-बाधक चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला आणि भाजपने गोंधळात महत्त्वाचे विषय केवळ दोन मिनिटात विनाचर्चा मंजूर केले. त्यामुळे हे सर्व नियोजनबद्ध असल्याचा संशय शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी व्यक्त केला. तर, भाजपने सभागृहात चर्चा न करता लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करत भोसरीतील रुग्णालयाच्या खासगीकरणा विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी दिला. यापूर्वी देखील शिक्षक वर्गीकरणाच्या विषयावरून कलाटे यांनी साने यांच्या भूमिकेबद्दल शंका व्यक केली होती. पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती झाल्याने विरोधकांमध्ये फुट पडल्याचे स्पष्ट झाले.

“ती’ ऑडिओ क्‍लिप आयुक्‍तांना सादर
सभा कामकाज संपल्यानंतर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी संतपीठातील “रिंग’ संदर्भातील ठेकेदारांचे संभाषण पत्रकारांना ऐकविले. त्यामध्ये तीन ठेकेदारांनी मिळून “रिंग’ केल्याचे ठेकेदारांनी मान्य केल्याचा दावा साने यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह “रेकॉर्डिंग’ असलेली “ऑडिओ क्‍लिप’ आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना सादर करण्यात आली आहे. शिवसेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीकडून संतपीठाच्या विषयाला असलेल्या विरोधाबाबत प्रशासनाला दिलेली निवेदने पडताळून पाहण्याचे आवाहन केले आहे. तसेच भाजपसोबत कोणतीही छुपी युती असल्याचे आरोप फेटाळून लावले.

Leave A Reply

Your email address will not be published.