संजय झंवरला बरा व्हायला अजून चार दिवस

जिल्हा रुग्णालयाचे न्यायालयात म्हणणे; पोलिसांना प्रतिक्षा डिस्चार्जची

सातारा, दि. 8 प्रशांत जाधव 

संशयित संजय झंवर बरा व्हायला अजून चार दिवस लागतील, असे उत्तर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिल्याने पोलिसांना आता झंवरच्या डिस्चार्जची प्रतीक्षा लागली आहे. पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्यानंतर झंवर याला अचानक पोटात व छातीत कळा येऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर झंवर याला नेमका कोणता आजार झाला असून तो बरा व्हायला किती कालावधी लागेल, याबाबत मोक्का न्यायालयाने विचारणा केली होती. त्यावर जिल्हा रुग्णालयाने हे उत्तर दिले आहे.

साताऱ्यातील शेतजमिनीच्या विषयावरुन ऑक्‍टोबर 2017 मध्ये संशयित मंगेश सावंत याने या प्रकरणातील तक्रारदार राजकुमार जाधव यांच्या पुसेगाव येथील घरात घुसून जागेच्या कारणातून शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेनंतर सुमारे 12 ते 13 दिवसांनी दुपारी संशयित दत्ता जाधव, चंद्रकांत सावंत, मंगेश सावंत व इतर अनोळखी 8 ते 10 जण 302 या स्कॉर्पिओसह अन्य वाहनांतून पुसेगाव येथे आले होते.

राजकुमार जाधव यांना संशयितांनी सिध्दनाथ पतसंस्थेजवळ सेवागिरी ट्रेडर्स दुकानासमोर बोलावून घेतले. “साताऱ्यातील शेतजमिनीचे सुरु असलेले कोर्टमॅटर मिटवून घेण्यासाठी तक्रारदारांना 16 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही संशयितांनी दिली होती. तक्रारदार यांचे मेहुणे सर्जेराव माने व त्यांच्या बहिणींच्या सह्या फसवून घेऊन गीताबाई झंवर, जयंत गोविंद ठक्कर (रा.सातारा) यांच्या नावाने 75 गुंठ्याचे कुलमुखत्यारपत्र केल्याचा वाद न्यायालयात दाखल होता.

याप्रकरणात दत्ता जाधवसोबत सातारा शहरातील अनेक पांढरपेशांची नावे याप्रकरणात समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर याप्रकरणाचा तपास थंडावला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कारवाईचा ससेमिरा लावल्याने व यातील संजय झंवर याला अटक केल्याने बाकीच्यांनी पळ काढला.

झंवर याला अटक केल्यानंतर अचानक झंवरच्या छातीत कळा आल्याने त्याचा रक्तदाब वाढल्यामुळे उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुणे येथील मोक्का न्यायालयाने झंवरला रुग्णालयातून कधी सोडणार, अशी विचारणा पोलिसांना व रुग्णालय प्रशासनाकडे केली होती.

त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने झंवर याला आजारातून बरे होण्यासाठी अजून चार दिवस लागतील, असे लेखी म्हणणे मोक्का न्यायालयात दिले आहे. त्यामुळे याप्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी सध्या तरी पोलिसांना झंवरच्या डिस्चार्जचीच वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)