संघर्षयात्री जॉर्ज (अग्रलेख)

देशातील फायरब्रॅंड राष्ट्रीय नेत्यांमध्ये ज्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल त्या जॉर्ज फर्नांडिस यांनी आज वयाच्या 88 व्या वर्षी दिल्लीच्या रुग्णालयात अखेरचा श्‍वास घेतला. सर्वच पातळ्यांवर सातत्याने संघर्ष करून हे लोकसमर्पित नेतृत्व आकाराला आले होते. आयुष्यातील अखेरची अनेक वर्षे ते राजकारण आणि समाजकारणापासून दूरच राहिले होते. त्यामुळे हे महान नेतृत्व काहीसे विस्मृतीतच गेल्यासारखे होते. आज त्यांच्या निधनाच्या बातमीनेच त्यांचे नाव पुन्हा
चर्चेत आले. त्यांच्या राजकीय आयुष्यात त्यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा पूर्ण प्रभाव होता; पण वाजपेयी सरकारच्या काळात ते जेव्हा मंत्री झाले त्यावेळी देशावर आर्थिक उदारीकरणाचे गारूड होते.

1991 साली मनमोहन सिंग-नरसिंह राव यांच्या काळात देशाने पहिल्यांदा समाजवादी आर्थिक विचारसरणीला बाजूला सारत मुक्‍त अर्थव्यवस्थेची कास धरली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेने मोकळा श्‍वास घेतला. त्याचा लाभ उठवत विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसायांनी नवी उंची गाठत देशाला आर्थिक भरभराटीचे दिवस आणले. वाजपेयी सरकारने याच धोरणांचा पाठपुरावा करण्याचे धोरण अनुसरले. सरकारी मालकीच्या कंपन्यांचे खासगीकरण करून त्या विकण्यासाठी वाजपेयी सरकारच्याच काळात निर्गुंतवणूक मंत्रालय नावाचे स्वतंत्र खातेच उघडण्यात आले होते. समाजवादी विचारसरणीच्या जॉर्जना या नव्या आर्थिक वातावरणात काम करावे लागले. पण त्यांनी होता होईल तेवढे जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. ज्या कोकाकोलासह विदेशी कंपन्यांना जॉर्जनी प्राणपणाने विरोध केला होता त्याच विदेशी कंपन्यांना देशात निमंत्रण देण्यासाठी वाजपेयी सरकारचे मंत्री वारंवार विदेश दौरे करू लागले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही याच कामासाठी सातत्याने विदेशात दौरे करत असत. हा सारा नव्या विचारसरणीचा दौर जॉर्जना पाहावा लागला. दूरसंचार आणि रेल्वेखात्याची मंत्रिपदे सांभाळणाऱ्या जॉर्जना नंतर संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. संप, बंद अशा आंदोलनांमुळे त्यांचे नेतृत्व उदयाला आले पण नंतरच्या काळात संप आणि बंदचा जमाना मागे पडल्यानंतर दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात जॉर्ज यांनी मुरब्बी राजकारण्याची भूमिका वठवली. मंगळुरूला जन्मलेल्या जॉर्ज यांनी मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप घडवून आणत बंद सम्राट अशी प्रतिमा निर्माण केली होती. नंतरचा काही काळ त्यांनी मुंबई हीच स्वत:ची कर्मभूमी म्हणून निवडली. तथापि, नंतर उदयाला आलेल्या खासगी उद्योगांच्या कामगार संघटनांमध्ये त्यांना आपले बस्तान बसवता आले नाही. त्यामुळे त्यांनी नंतर मात्र बिहारी राजकारणात आपले बस्तान बसवले. नितीशकुमार यांच्या समवेत समता पार्टीचा यशस्वी प्रयोगही त्यांनी तेथे केला. त्यांच्या संसदीय कारकिर्दीला 1967 सालच्या मुंबईतील लोकसभा निवडणुकीने खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यावेळच्या निवडणुकीत त्यांनी मुंबईचे दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स. का. पाटलांचा पराभव केला. त्यानंतर 2004 पर्यंत त्यांनी एकूण नऊ वेळा लोकसभेवर निवडून जाण्याची कामगिरी केली.

आणीबाणीच्या काळात जॉर्ज यांच्या नेतृत्वाचा देशभर गवगवा निर्माण झाला. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी अत्यंत आक्रमक लढा दिला. त्यात त्यांना अटकही झाली. इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाही राजवटीला विरोध म्हणून त्यांनी बॉम्बस्फोटासारख्या मार्गाचाही अवलंब केला होता. बडोदा डायनामाईट केस ही त्या काळातील अत्यंत गाजलेली केस होती. पुण्यात पिंपरीजवळ त्यांनी रेल्वेतून जाणारी शस्त्रेही लुटण्याचा कट केला होता. तर असे हे अत्यंत धाडसी आणि काहीसे उपद्‌व्यापी नेतृत्व होते. 1977 साली झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाला आणि जनता पार्टीचा उदय झाला. त्या पक्षाच्या सरकारमध्ये जॉर्ज एखाद्या सिंहासारखे वावरले. त्यांच्याकडे त्या सरकारमध्ये उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला होता. समाजवादी विचारांच्या जॉर्जनी त्यावेळी देशात कार्यरत असलेल्या कोकाकोला आणि आयबीएम या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतातील गाशा गुंडाळण्याचा आदेश देऊन त्यांचे भारतातील उद्योग पूर्णपणे बंद केले. पण नंतरच्या काळात मात्र त्यांनी आर्थिक उदारीकरणाची धोरणे निमूटपणे मान्य केली.

जॉर्ज यांचे नेतृत्व निःस्पृह होते. साध्या राहणीसाठीही ते ओळखले जात. पण मंत्री म्हणून त्यांची कामगिरीही बऱ्याच वादाला कारणीभूत ठरली आहे. बराक क्षेपणास्त्र घोटाळा, तहलका घोटाळा, शवपेट्यांचा घोटाळा अशा घोटाळ्यांमध्ये त्यांचे नाव आले. पण त्यातूनही ते तावूनसुलाखून बाहेर पडले. समाजवादी विचारसरणीत धर्माच्या संकल्पनांना थारा नसतो पण जॉर्ज हे त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात रोमन कॅथालिक प्रिस्ट होते हे फार कमी लोकांना माहिती आहे. वयाच्या 16 ते 19 वर्षाच्या काळात त्यांनी ख्रिश्‍चन सेमिनरीमध्ये मंगळूरला हे काम केले. पण त्यांना तेथील भोंदूपणाचे वातावरण भावले नाही. त्यानंतर मात्र त्यांनी स्वत:ला गरीब आणि उपेक्षितांच्या लढ्यासाठी झोकून दिले. पुढे आयुष्यभर त्यांनी कामगारांबरोबरच शेतकऱ्यांचेही अनेक लढे देत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. वैचारिक, राजकीय संघर्षात जॉर्ज नेहमीच केंद्रस्थानी राहिले होते.

1977 साली सत्तेवर आलेल्या जनता पार्टीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आडवाणी, वाजपेयी आदी नेत्यांचाही समावेश होता. त्यावेळी मंत्रिपदावर असलेल्या नेत्यांचे संघाशी असलेले संबंध अनेकांना खुपत होते. त्यामुळे दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून मोरारजी देसाई यांचे सरकार पडले. या घडामोडीत जॉर्ज आघाडीवर होते. जनता पार्टीतील नेत्यांनी संघाशी असलेले संबंध तोडावेत म्हणून ज्या जॉर्जनी आग्रह धरला त्याच जॉर्ज यांनी पुढे वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सत्ता उपभोगली. काही वेळा त्यांना अशी तडजोड करावी लागली असली तरी त्यांच्या एकूण व्यक्‍तिमत्त्वाचा करिष्मा शेवटपर्यंत कायम राहिला. अशा या लोकसमर्पित नेतृत्वाने आज अखेरचा श्‍वास घेतला आहे. त्यांना विनम्र आदरांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)