संगम जलाशय भरून ओसंडला

परिंचे- मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वीर (ता. पुरंदर) येथील संगम जलाशय ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप यादव यांच्या हस्ते पाण्याचे पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच समीर जाधव, उपसरपंच सोपान राऊत उपस्थित होते.
पांगारे खोऱ्यातून वाहणारी रुद्रगंगा व काळदरी खोऱ्यातून येणारे पाणी लघू पाटबंधारे विभागाच्या संगम जलाशयात जमा होते. या जलाशयाची पाणी क्षमता 90.20 द.ल.घ.फु आहे. या जलाशयावर अनेक उपसा सिंचन योजना असून 895 एकर क्षेत्र ओलिताखाली आली आहे. दुष्काळात आरक्षित पाणी ठेवण्यासाठी जलाशयाचा उपयोग केला जातो. खरीपातील पिकांसाठी सुद्धा या जलाशयातून उपसा पध्दतीने पाणी पुरवठा करण्यात येतो.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव म्हणाले की, पुरंदर किल्ल्याच्या परिसरात दरवर्षांच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे माहूर, पिलाणवाडी, संगम हे तीन जलाशय पुर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये मध्ये समाधानाचे वातावरण आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
जलाशयातील उपसा पाण्यावर ऊस, टॉमेटो, कांदा, मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. रब्बी हंगामात पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी माहूर गावचे सरपंच सुशील चव्हाण, माजी सरपंच सुनील शिंदे, संतोष शेडगे, बाळासाहेब राऊत, वसंत राऊत, रामदास राऊत, प्रकाश जाधव, गणेश गुळदगड, सोमनाथ ओव्हाळ, संतोष राऊत, गणेश वाघ, जलाशयाचे पाटकरी मोतीराम खेंगरे आदी उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)