संगमनेरमध्ये शहिदांना श्रद्धांजली वाहून शिवजयंती साजरी

जोगवडी- संगमनेर (ता. भोर) येथे दरवर्षी ढोल-लेझिम पथकाच्या गजरात शिवजयंती साजरी केली जाते. मात्र, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्याचे भान ठेवून गावातील नागरिकांनी मिरवणूक काढताना ढोल-लेझीम पथकाचा वापर न करता मेणबत्त्या पेटवून, शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून मिरवणूक काढली. येथील लक्ष्मी मंदिर ते काळभैरवनाथ मंदिराच्या चौकापर्यंत कोणत्याही प्रकारच्या वाद्याचा आवाज न करता अत्यंत शांततेत ही मिरवणूक काढण्यात आली. काळभैरवनाथ मंदिराच्या चौकात राष्ट्रगीत म्हणण्यात आले. त्यानंतर “जय भवानी-जय शिवाजी’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी काळभैरवनाथ तरुण मंडळ, गावातील नागरिक, महिला व छोट्या मुलांनी हजेरी लावली.

Leave A Reply

Your email address will not be published.