श्री जननीदेवी यात्रा उत्सव म्हसवे (वडाचे) विशेष…

सातारा जिल्ह्यातील अनमोल ठेवा म्हणून म्हसवे ता. जावळी येथील महाकाय वटवृक्षांची ख्याती आहे. येथील वटवृक्षाचा वंश तब्बल अडीच एकर परिसरात विस्तारला असून, तो विस्ताराने आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. या वटवृक्षाची ब्रिटिशकालीन फ्लोरा ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये प्रथम क्रमांकाचा वटवृक्ष म्हणूनही नोंद आहे. त्यामूळे येथे महाराष्ट्र व बाहेरीलही पर्यटक वटवृक्ष पाहण्यासाठी येत असतात, मात्र त्या ठिकाणी कसल्याही आवश्‍यक सुविधा नाहीत.

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वैराटगडाच्या पायथ्याशी असलेल्या म्हसवे (वडाचे) गावाला महाभारत कालीन शिवकालीन असा उज्वल आणि समृद्ध वारसा आहे याच उज्वल वर्षाचे प्रतिक म्हणून सर्वांच्या दातृत्वाने आणि सक्रिय सहभागातून साकारलेल्या श्री जननी-माता देवी या ग्रामदेवतेची वार्षिक यात्रा गुरूवार दि.21 रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने वडाचे म्हसवे या गावाविषयी घेतलेला आढावा….

उज्वल, समृद्ध वारसा लाभलेले गाव म्हसवे (वडाचे)

श्री जननी-माता देवी, श्री गणेश, श्री विठ्ठल-रखुमाई व हनुमान दैवतांची प्रतिष्ठापना व कलशारोहण 2010 साली सद्गुरू सेवागिरी मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला होता. म्हसवे येथील ग्रामस्थ मुंबईकर ग्रामस्थ आणि अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून चाळीस लाख रुपये खर्च करून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास करण्यात आले होते. खऱ्या अर्थाने म्हसवेकर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या दृष्टिकोनातून हा आनंद एक आनंद सोहळाच ठरला होता. श्री जनानी देवी हे दैवत या परिसरात जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते कुडाळ येथील ग्रामदैवत श्री पिंपळेश्‍वर वाकडेश्‍वर व सरताळे येथील श्री भाग मल्ल देव या भावांची बहिण म्हणून श्री जननी देवीची ख्याती आहे. या देवस्थानवरील श्रद्धेमुळे कुडाळ, सरताळे आणि म्हसवे या गावांत जिव्हाळ्याचे व दृढ संबंध निर्माण झाले आहेत.
म्हसवे या गावाला महाभारत कालीन वारसा आहे, पांडव वनवासात असताना त्यांचे वास्तव्य वैराट गडावर होते या गडावर पांडवकालीन अशी सात तळी आहेत या गडावर शिव मंदिर, हनुमान मंदिर, बाळोबाचे मंदिर आणि डोंगरावरील काळुबाई ही मंदिरे आहेत या गडावर महामंडलेश्‍वर वैराटवासी आबानंदगिरी महाराज यांचे वास्तव्य असते. याच वैराटगड याच्या कुशीत म्हसवे गाव वसलेले आहे. गडाच्या काही भागात उत्तम तटबंदी केलेली आहे. म्हसवे गावातील वटवृक्ष हा आशिया खंडातील सर्वात मोठा वटवृक्ष म्हणून गणला गेलेला आहे. या वटवृक्षामुळेच गावाला (वडाचे) म्हसवे हे नाव प्राप्त झालेले आहे.

याची विशेष दखल पुरातत्त्व विविभागाने घेतलेली आहे, ज्ञान-विज्ञान आणि सुसंस्काराची कास धरणारे गाव म्हणून या गावचा नावलौकिक आहे ही विचारवंतांची कर्मभूमी आहे, कलेच्या विविध क्षेत्रांमध्ये या गावातील व्यक्तींनी आपला ठसा महाराष्ट्रभर उमटविला आहे नाट्य संस्कृती जोपासणारे गाव म्हणून या गावची खरी ओळख आहे, याच नाट्य संस्कृतीतून या गावाने आनंद म्हसवेकर सारखे नाट्य दिग्दर्शक कलाकार मराठी रंगभूमीला दिलेले आहेत. श्री जननी मातेच्या देवस्थाना बरोबरच गावातील तितकेच महत्त्वपूर्ण देवस्थान म्हणून श्री काळूबाई देवस्थानचा उल्लेख करावा लागेल.

मांढरदेवची काळूबाई, कुसुंबीची काळुबाई यांची बहिण असणारी म्हसवे गावची काळुबाई ही देखील जागृत देवस्थाने असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत जागरूक गाव अशी या गावची ख्याती आहे, सांघिक भावना, सामाजिक ऐक्‍य ही तर या गावाला मिळालेली देणगी आहे. येथील ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा हा भाविकतेचे दर्शन घडविणारा असतो. यात्रेच्या वेळी निघणारे बगाड ही यात्रेकरूंसाठी एक पर्वणी असते, म्हसवे गाव शैक्षणिक क्षेत्रातही प्रगतीपथावर असून जावळी शैक्षणिक पॅटर्नमध्ये गावाचा सिंहाचा वाटा आहे, गावातील अनेक लोक विविध ठिकाणी वरिष्ठ हुद्‌द्‌यांवर कार्यरत आहेत, मुंबईसारख्या शहरात गिरणी कामगार चळवळीतही या गावातील काहींनी नेतृत्व केलेले आहे, उद्योग-व्यवसायातही काहींनी भरारी घेतली असून काही गावकरी परदेशातही कार्यरत आहेत, जावळी तालुक्‍यातील राजकीय श्रेत्रात, सर्व सहकारी संस्था, औद्योगिक संस्थांत म्हसवे ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा आहे.

म्हसवे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने वडाचे म्हसवे या क्षेत्राला क वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. प्रस्तावित आराखड्यात त्या ठिकाणी चौकीदारची नेमणूक, लाईट, पाणी, आदींची व्यवस्था तसेच पर्यटकांना बसण्यासाठी कट्टे, प्रसाधनगृहे, फूटपाथ, मंदिराची दुरूस्ती आदी सर्व आवश्‍यक गोष्टींचा समावेश आहे. मात्र त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही ती त्वरीत मिळावी. त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी.
सौ. अरूणा शिर्के
माजी सभापती, पं.स.जावली
– शब्दांकन
सचिन वारागडे

Leave A Reply

Your email address will not be published.