श्रीगोंद्यात करोनाचा तिसरा रुग्ण 

28 मे रोजी श्रीगोंद्यात आल्यावर केले होते क्वारंटाईन

श्रीगोंदा  -तालुक्‍यात करोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. मुंबईहून श्रीगोंद्यात आलेल्या 85 वर्षीय वृद्धेला करोनाची बाधा असल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, 26 मे रोजी एक 85 वर्षीय महिला मुंबईहून तालुक्‍यातील एका गावात आली. 28 मे रोजी त्या महिलेला श्रीगोंदा येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. 31 मे रोजी या महिलेचा स्त्राव श्रीगोंदा येथे घेऊन तो नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. या महिलेच्या करोना तपासणीचा अहवाल आज प्राप्त झाला असून, त्यात तिला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, मुंबईहून आलेल्या महिलेचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्‍यातील रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे. यापूर्वीच्या श्रीगोंदा फॅक्‍टरी येथील दोन्ही करोनाबाधित आता ठणठणीत आहेत. लॉकडाऊन शिथिल होत असताना तालुक्‍यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.